पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ करून, अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. याबाबत लक्ष्मण हाके यांना मराठा आंदोलकांनी घेरावा घालून जाब विचारणारा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शहरातील मराठा आणि ओबीसी समाजातील नेते मंडळी कोंढवा पोलिस स्टेशन परिसरात आल्यावर जोरदार घोषणाबाजी पाहण्यास मिळाली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच दरम्यान लक्ष्मण हाके यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर मराठा समजातील कार्यकर्ते जमवून घोषणाबाजी करण्यात आली.
कोंढवा रोड परिसरात लक्ष्मण हाके यांनी मराठा बांधवाना दारू पिऊन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांची ससून रुग्णालय आणि खासगी लॅब मध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, त्यामधून लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायल्याचे स्पष्ट होईल अशी भूमिका मराठा आंदोलकांनी यावेळी मांडली.
आणखी वाचा-Baramati Assembly Election : विधानसभेला बारामतीत काका-पुतण्या भिडणार का? कसं आहे राजकीय समीकरण?
या आरोपावर लक्ष्मण हाके म्हणाले की, माझं घर कात्रज परिसरात आहे. तेथून काही अंतरावर वॉक करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी दोन तरुणांनी माझ्याकडे येऊन चर्चा केली आणि तेच तरुण काही वेळाने काही लोकांचा जमाव घेऊन माझ्याकडे आले. माझे दोन्ही हात पकडून मला एकाच जागेवर थांबवून ठेवले. त्यावेळी मी पोलिसांना फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. त्यामुळे एकूणच प्रकरण पाहिल्यावर, मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता आणि मी जर ड्रिंक केले असेल तर पोलिस विभागाच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यामधून सर्व गोष्टी समोर येतील, मी कुठेही पळून गेलो नसून पोलिसांच्या सर्व तपासणीला, चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.त्यामुळे आजच्या घटनेमधून एक सांगू इच्छितो की, विवेकाचा आवाज, शोषितांचा आवाज आणि ओबीसीचा आवाज जर कोणी मला दारू पिल्याचा आरोप करून कोणी संपवू पाहत असेल तर मी गोळ्या देखील खायला तयार आहे. वार देखील झेलण्यास तयार आहे आणि जीवे जाण्यास देखील तयार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.
तसेच, मी जर काही चुकीचे केल्याचा एक जरी पुरावा समोर आल्यास लक्ष्मण हाके महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कधीच दिसणार नसल्याची भूमिका देखील यावेळी त्यांनी मांडली. लक्ष्मण हाके आणि काही आंदोलनकर्ते या दोन्ही बाजूंनी तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारी नुसार तपास करण्यात येत असल्याचे पोलिस उपायुक्त श्री. राजा यांनी सांगितले.