ओबीसींच्या आरक्षणात आम्हाला वाटा मागायचा नाही. त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता शैक्षणिक व नोकरीत आरक्षण हवे आहे. आरक्षणाची लढाई सत्तेसाठी नसून सामाजिक प्रबोधनासाठी आहे, असे विचार संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी आकुर्डीत व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आकुर्डी विभागाच्या वतीने ‘ओबीसी प्रवर्गात मराठा (कुणबी) समाजाचा समावेश, समज व गैरसमज’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, शहराध्यक्ष अभिमन्यू पवार, खंडोबा देवस्तान ट्रस्टचे अध्यक्ष व्ही. एस. काळभोर, माजी नगरसेवक दिनकर दातीर, शंकरराव पांढरकर, धनंजय काळभोर, सविता सायकर, मारुती भापकर, अप्पा बागल, गोविंद काळभोर, तुकाराम काळभोर, ऊर्मिला काळभोर, प्रा. सचिन काळभोर आदी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, मराठा आरक्षणाची भूमिका समजावून घेताना सांस्कृतिक संघर्ष लक्षात घेतला पाहिजे. मराठा आरक्षणाची मागणी निमित्त असून समता, न्याय व बंधुता प्रस्थापित करणे उद्दिष्ट आहे. जोपर्यंत मराठे संघटित होत नाहीत तोपर्यंत न्याय मिळणार नाही. संघर्षांशिवाय न्याय मिळत नाही, हा इतिहासच आहे. समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा सक्षम बनवण्यासाठी आरक्षण हवे आहे. आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रायगडावर लाखोंच्या संख्येने उपोषणास बसू, असा इशाराही त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. प्रास्ताविक सचिन काळभोर यांनी केले. अभिमन्यू पवार यांनी आभार मानले.