गेल्या पावणेदोन वर्षापासून करोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. मात्र सद्या स्थितीला काही प्रमाणात सर्व व्यवसाय पूर्वपदावर आल्याचे दिसत आहे. मात्र या पावणेदोन वर्षातील लॉकडाऊन सर्वांच्या कायम लक्षात राहणारा ठरला आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीला बाहेर पडलेले अनेकजण तिथेच अडकून पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पुण्यात एका १४ वर्षीय मुलासोबत असाच काहीसा प्रसंग घडला होता. मात्र यावेळेचा त्याने उपयोग करत काहीसा वेगळा प्रयोग केला आहे.
गुडगाव येथील १४ वर्षीय तनिष व्यंकटेश पुण्यातील बिबवेवाडी भागात राहणार्या आजीकडे सुट्टी निमित्ताने आला आणि त्यानंतर काही दिवसात कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तो तिथेच अडकला. दरम्यान तनिषच्या मनात मराठा साम्राज्याचा इतिहास इंग्रजी भाषेतून सर्वांसमोर आला पाहिजे असा विचार बर्याच दिवसापासून सुरु होता. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा उपयोग करत त्याने हा विचार प्रत्यक्षात आणायचे ठरवले आणि सुरुवात केली.
त्यानुसार तनिषने ऐतिहासिक पुस्तकाचे वाचन,ऑनलाईन माहितीच्या आधारे आणि इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन घेऊन, “मराठा साम्राज्य” असे पुस्तक इंग्रजी भाषेत लिहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते माधवराव पेशवे यांच्या दरम्यानच्या १७ घटनांचा इतिहास ११९ पानांमधूनन इंग्रजी भाषेतून जगासमोर आणण्याचे काम त्याने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसत्ता डॉट कॉमच्या प्रतिनिधीने त्याच्याशी संवाद साधला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुस्तकातील ‘तो’ उल्लेख मला खटकला : तनिष व्यंकटेश
“मी गुडगाव येथील सीबीएसई बोर्डाच्या शाळेत सातवीची परीक्षा देऊन,पुण्यात आजीकडे आलो. त्याच दरम्यान करोना विषाणूमुळे कडक लॉकडाऊन लागला. त्यामुळे कुठे ही जाता येत नव्हते. माझ्या शाळेत जो इतिहास सांगितला जातो तो दिल्लीचा सांगितला जात आहे. तिथे भारतीय साम्राज्याबद्दल सांगितले जात नाही. मुघलांचे राज्य, दिल्लीचा सुलतान आणि ब्रिटिशांबाबत अधिक शिकवले जात आहे. आपल्या मराठा,शीख,विजयनगर आणि साम्राज्यांवर अधिक लक्ष दिले जात नाही. माझी पिढी अधिक व्हिडिओमधून हे सर्व पाहते. यामुळे वाचन कमी झाल्याने मी एक ठरवले की, मी छोट्या स्वरुपात इतिहास लिहायला हवा. पण तो सर्वांपर्यंत अगदी सहजपणे पोहोचला पाहिजे. त्या दृष्टीने पुढील कामास सुरुवात केली. पण त्याही अगोदर ज्यावेळी मी सातवीत गेलो तेव्हा आम्हाला जो इतिहास शिकवला गेला. त्यामध्ये दिल्ली सुलतान, मुघलांचा विषय होता. यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल (Chieftain) असा उल्लेख केला होता. म्हणजे मुखीया असा उल्लेख केला होता. ती गोष्ट मला खूप खटकली आणि ते आपले राजे आहेत त्यामुळे पुण्यात आल्यावर खऱ्या अर्थाने मी पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली,” असे तनिष व्यंकटेश म्हणाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शाह यांना भेटण्याची इच्छा
“आपल्या मराठा साम्राज्याचा प्रवास अगदी कमी शब्दात लिहिणे सोपे नव्हते. खूप पुस्तके वाचली, त्यातून मी आहे तसे लिहिले नसून माझी मते मांडली आहेत. जेणेकरून माझ्या पिढीला अगदी सहजरित्या समजेल. तसेच पुस्तकातील चित्रे देखील मी काढले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराज ते थोरले माधवराव पेशवे यांच्यापर्यंतचा इतिहास आपल्या समोर आला आहे. हे पुस्तक लिहिल्यावर अनेकांना भेटण्याचा योग आला. त्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अविनाश धर्माधिकारी, रणजित नातू, उदय कुलकर्णी, गजानन मेहेंदळे यांचा समावेश आहे. त्या सर्वांनी माझ्या पुस्तकाचे कौतुक केले. आता या पुस्तकांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना भेटायचे आहे,” असे तनिष व्यंकटेश म्हणाला.
मराठा साम्राज्यामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना
“मी मराठा साम्राज्य सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे माझं लक्ष भारताचा इतिहास सर्वांसमोर आणण्याचे आहे. तसेच मराठा साम्राज्यामुळे भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि ते १८व्या शतकातील सर्वात मोठे साम्राज्य होत. म्हणून मी मराठा साम्राज्यापासून सुरुवात केली आहे. मी आता १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामावर लिहिण्यास सुरुवात केली,” असे तनिषने सांगितले.