पिंपरी : मराठा समाजाला गृहीत धरून राज्यकर्ते वागतात. निवडून आल्यानंतर समाजाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मराठांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकविण्याचे आवाहन मराठा सेवा संघाने केले आहे. आकुर्डीत झालेल्या मराठा सेवा संघाच्या मेळाव्याला पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, डॉ. मोहन पवार, गोविंद खामकर, शीतल घरत उपस्थित होते.
छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजाच्या हितासाठी खंबीरपणे समाजाच्या मागे उभे राहतात, समाजाच्या बाजूने बोलतात. परंतु, मराठा समाजाचे अनेक आमदार, खासदार महत्त्वाची पदे, उमेदवारी मिळविण्यासाठी समाजाच्या बाजूने बोलताना दिसत नाहीत. मराठा समाजाचे आरक्षण, त्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदार, खासदारांना धडा शिकवा असे आवाहन रानवडे यांनी केले.
हेही वाचा – विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! पुणे मेट्रोचा प्रवास आता सवलतीत
हेही वाचा – कोल्हापूरचा विशाल पिंजानी ठरला ‘मिस्टर गे इंडिया 2023’चा विजेता
नगरसेवक, आमदार, खासदारांना भेटून मराठा आरक्षणाबद्दल बोलण्यास भाग पाडले पाहिजे. महाराष्ट्रातील ठरावीक घराणी सोडली. तर, मराठा समाजाला अतिशय वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे. इतर समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाने कधीही कोणाला विरोध केला नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळताना कोणीही विरोध करू नये, असे डॉ. पवार म्हणाले.