‘गदिमा स्मृती सोहळ्यात’ १४ डिसेंबरला प्रकाशन
साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या निवडक १४ कथा ‘सिलेक्ट स्टोरीज ऑफ ग. दि. माडगूळकर‘ या शीर्षकाने प्रकाशित होणार आहेत.
‘गदिमा साहित्य कला अकादमी’ आणि प्रा. उल्हास बापट हा कथासंग्रह प्रकाशित करणार आहेत. प्रा. विनया बापट यांनी कथांचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. ‘गदिमा स्मृती सोहळ्यात‘ १४ डिसेंबरला त्याचे प्रकाशन होणार आहे. ‘सिनेमातला माणूस‘, ‘वेडा पारिजात‘, ‘औंधाचा राजा‘, ‘श्री गुरुचरित्राचा ग्रंथ‘, ‘कृष्णाची करंगळी‘, ‘अधांतरी‘, ‘नेम्या‘, ‘पंतांची किन्हई‘, ‘सगुणा‘, ‘शास्त्रज्ञ‘ ‘एक स्त्री आणि एक कुत्रे‘ ‘मन हे ओढाळ‘ ‘गुरु‘, ‘माणूस अखेर माणूस आहे‘, ‘वासना‘, ‘व्यथा‘ इत्यादी १४ कथांचा यात समावेश आहे. गदिमांच्या जन्म शताब्दीनिमित्त ‘गदिमा साहित्य कला अकादमी‘चा हा पहिला उपक्रम आहे.
गदिमांचे साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी ‘गदिमा साहित्य कला अकादमी‘ स्थापली आहे. गदिमांचे साहित्य-चित्रपटांचा प्रचार आणि प्रसार करणे, गदिमांचे स्मारक बांधणे ही या संस्थेची मुख्य उद्दिष्टे आहेत.
गीत रामायणाचेही हिंदी भाषांतरही दोन महिन्यांत प्रसिद्ध होणार असून ते ध्वनीचित्रफीत स्वरूपातही आहे. आजच्या डिजिटल पिढीला गदिमांचे साहित्य सहज वाचता यावे, त्यांनी ते ऐकावे आणि त्यांना ते आपलेसे वाटावे यासाठी ‘गदिमाडगूळकर डॉट कॉम’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर फेसबुक पानावर गदिमांच्या आठवणी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय ‘पेनड्राइव्ह’ आणि ‘सीडी’वरही हे साहित्य उपलब्ध आहे, असेही माडगूळकर यांनी सांगितले.