पुणे : ‘अनेक प्रकारची राजकीय-सामाजिक स्थित्यंतरे आजूबाजूला घडत आहेत. समाज, संस्कृती आणि भाषेतही मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. भाषा ही संवादाचे माध्यम आहे. भाषा मुळात प्रवाही असते. त्यामुळे मराठीसाठी अट्टहास धरून काहीही होणार नाही. या भाषेविषयीची गोडी निर्माण व्हायला हवी, तेव्हाच खरे प्रश्न सुटतील,’ असे मत ज्येष्ठ नाट्य समीक्षक विद्यानिधी वनारसे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बालेवाडी येथील ‘द ऑर्किड हॉटेल’ येथे आयोजित ‘माझी भाषा, माझा अभिमान’ या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, चित्रकार जयंत बी. जोशी, उद्योजक डॉ. विठ्ठल कामत आणि वनारसे यांनी मराठी भाषेचा ऐतिहासिक वारसा, तिचे आधुनिक काळातील महत्त्व आणि भविष्यातील भूमिका या विषयांवर चर्चा केली. चर्चासत्राचे संचालन पत्रकार प्रतिभा चंद्रन यांनी केले. त्या वेळी वनारसे बोलत होते.

वनारसे म्हणाले, ‘भाषा ही फक्त जाज्वल्य अभिमान व्यक्त करण्यासाठी वापरायची नसते. त्या पलीकडेही ती जायला हवी. भाषिक देवाणघेवाण करतच आपली मातृभाषा जपावी आणि वृद्धिंगत करावी.’ ‘सध्या तंत्रज्ञानाची भाषा ही वेगळी आहे. ती मराठी नाही. त्यामुळे भाषेच्या वापराला अनेक प्रकारच्या मर्यादा आलेल्या आहेत. चित्रलिपीचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, भाषेचे महत्त्व टिकून आहे. समाजात होत असलेल्या स्थित्यंतराचे प्रतिबिंब भाषेमध्येही उमटत आहे. भाषेविषयीचे प्रेम आतून यायला हवे,’ असे मत जोशी यांनी व्यक्त केले.

डॉ. आगाशे म्हणाले, ‘मराठी नाटके भाषांतरित होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचत आहेत. जोपर्यंत हा समाज मराठी भाषा बोलेल, तोपर्यंत या भाषेचे अस्तित्वही टिकून राहील.’ ‘मराठीने आपल्याला भरभरून दिले आहे. आपणही मराठीसाठी परतफेड करायला हवी,’ असे विठ्ठल कामत यांनी सांगितले.