मुंबईच्या धर्तीवर पुणे महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या नाटय़गृहांमध्ये सादर होणाऱ्या नाटकांच्या बदललेल्या वेळा अवघ्या एका महिन्यात पूर्वपदावर आल्या आहेत. नाटय़निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने या बदलण्यात आलेल्या वेळा सोयीच्या नसल्याने या निर्णयाविरोधात तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत घटस्थापनेचा मुहूर्त साधून शनिवारपासून (१ ऑक्टोबर) नाटकांच्या वेळा पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच करण्यात आल्या आहेत.

पुण्यामध्ये महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे गेली अनेक वर्षे दुपारी १२.३०, सायंकाळी ५ आणि रात्री ९.३० या नाटकांच्या वेळा ठरलेल्या होत्या. महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नाटय़ आणि लावणी निर्माते, कलाकार, नाटय़ आणि लावणी व्यवस्थापक यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये नाटय़गृहांमध्ये होणाऱ्या नाटकांच्या वेळा दुपारी १२ ते ३, दुपारी ४ ते ७ आणि रात्री ८ ते ११ अशा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईमध्ये याच वेळांमध्ये नाटके सादर होत असून पुण्यातील नाटय़रसिकांच्या सोयीच्या दृष्टीने वेळ बदलण्यात येत असून १ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे तोंडी आदेश या बैठकीमध्ये महापौरांनी दिले होते.

या आदेशानुसार १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, ५ ते १५ सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेश कला क्रीडा मंच, बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह या तीनही नाटय़गृहांच्या तारखा ‘पुणे फेस्टिव्हल’साठी राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे उर्वरित १९ दिवसांत या नाटय़गृहांमध्ये बदललेल्या वेळेनुसार जे लावण्यांचे कार्यक्रम आणि नाटय़प्रयोग झाले त्याला प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. या बदललेल्या वेळा नाटय़निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या दृष्टीने सोयीच्या नसल्याचे ध्यानात आले.

प्रेक्षकांनाही नाटकाच्या वेळेतील हा बदल रुचलेला नाही. दोन नाटकांमध्ये अवघ्या एका तासात रंगमंदिराची स्वच्छता करण्यामध्ये प्रशासनालाही अडचणी येत होत्या. मुंबईतील नाटय़संस्थांना आर्थिक गणित परवडेनासे झाले आणि नाटकांना प्रेक्षक नसल्याने तिकिट बारीवरही नुकसान सोसावे लागले. त्यामुळे नाटय़निर्मात्यांनी या बदललेल्या वेळेच्या निर्णयाविरोधात रंगमंदिर व्यवस्थापकांकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत. नाटय़निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या तक्रारींची दखल घेऊन शनिवारपासून (१ ऑक्टोबर) नाटय़गृहातील नाटकांच्या वेळा पुन्हा पूर्वीप्रमाणेच दुपारी १२.३० सायंकाळी ५ आणि रात्री ९.३० अशा करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रंगमंदिर मुख्य व्यवस्थापक भारत कुमावत यांनी दिली.

Story img Loader