मराठी ही ज्ञानभाषा आहे असं नुसतं म्हणून लोक मराठीकडे वळणार नाहीत. जगभरामध्ये विविध विषयांवर उपलब्ध असलेलं ज्ञान मराठीत आणणं हे या प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यासाठी इतर भाषांमधली माहिती अनुवादित करून मराठीत आणणं, छापील मराठी माहिती संकलित करून फोटो स्वरूपात ब्लॉगवर टाकणं, तिचं युनिकोड रूपांतर करून ती सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध करून देणं हेही काम यानिमित्ताने सुरू झालं आहे.

सुचिकांत वनारसे.. व्यवसायाने संगणक अभियंता, नोकरीनिमित्त हैद्राबादमध्ये स्थायिक आणि तुमच्या-आमच्यासारखेच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्वीटरसारख्या समाजमाध्यमांवर रमणारे. अर्थात समाजमाध्यमांवर रमणारे एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही. कारण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्वीटर ही समाजमाध्यमं फक्त वेळ घालवण्यापुरती किंवा कुणाचं काय चाललंय याबद्दलची ‘गॉसिप्स’ करण्यापुरती राहिलेली नाहीत तर अनेक विधायक गोष्टीही या माध्यमांच्या व्यासपीठावरून उभ्या राहू लागल्या आहेत, याचं एक चालतंबोलतं उदाहरण अशीही त्यांची ओळख करून देता येईल. फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवरून मराठी शाळा वाचवण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या चळवळीला आज ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचं स्वरूप आलंय.

वनारसे सांगतात, ३ वर्षांपूर्वी फेसबुक, ट्वीटरसारख्या समाजमाध्यमांवर त्यांनी आपलं ‘अकाऊंट’ सुरू केलं. या माध्यमांवर होणारी बरीचशी चर्चा ही इंग्रजीतून चालायची. अशातच मराठी शाळा, शिक्षण यांच्याशी संबंधित फेसबुकवरच्या समूहांशी संपर्क झाला. तिथे वसंत काळपांडे, अनिल गोरे यांच्यासारखे शिक्षण क्षेत्रातले मार्गदर्शकही होते. मराठी शाळेत मुलांनी का शिकायला हवं वगैरे चर्चा तिथे सुरू असायच्या. सुरुवातीला माझा सहभाग हा पोस्टवर प्रतिक्रिया देण्याएवढाच मर्यादित होता. पण असं असलं तरी मराठी शाळेत मुलांना शिकवा हे एवढं सांगून पुरेसं नाही, मराठी शाळेत का शिकायला हवं, मराठीतून शिकल्यानं मुलांवर त्याचा काय परिणाम होणार आहे हेही सांगायला हवं अशा विचारातून काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आम्ही सुरू केले. त्या ग्रुपवरच्या चर्चामधून एक गोष्ट लक्षात आली. मराठी शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचाही आपली मुलं इंग्रजी शाळेत शिकवण्याकडे कल होता. मराठीतून शिक्षणाला भवितव्य नाही, इंग्रजीतलं शिक्षण दर्जेदार अशी भावना हे त्यामागचं मुख्य कारण. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अशा सगळ्या शिक्षक पालकांना एकत्र आणून मराठीतून शिक्षणाचं महत्त्व भावनिक नव्हे तर शास्त्रोक्त भाषेत समजावून दिलं. मराठी शाळांमध्ये मुलांना जे शिक्षण मिळतं ते इंग्रजी शाळांच्या तुलनेत किती उत्तम आहे याची जाणीवही या शिक्षकांना करून देण्यात आली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर सुमारे १०० मुलांचे प्रवेश इंग्रजीत न करता मराठीत केल्याचं कळवणारे शिक्षक पालक भेटले.

वनारसे सांगतात, मराठी ही ज्ञानभाषा आहे असं नुसतं म्हणून लोक मराठीकडे वळणार नाहीत. जगभरामध्ये विविध विषयांवर उपलब्ध असलेलं ज्ञान मराठीत आणणं हे या प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यासाठी इतर भाषांमधली माहिती अनुवादित करून मराठीत आणणे, छापील मराठी माहिती संकलित करून फोटो स्वरूपात ब्लॉगवर टाकणं, तिचं युनिकोड रूपांतर करून ती सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध करून देणं हेही काम यानिमित्ताने सुरू झालं. ज्या पालकांची मुलं शाळेत प्रवेश घेण्याच्या वयातील आहेत त्यांचं प्रबोधन करण्यासाठी व्याख्यानं देणं, सह्य़ांची मोहीम घेणं, असे उपक्रमही राबवले जातात.

४ जून २०१७ ला समाजमाध्यमातून सुरू झालेल्या ज्ञानभाषा समूहाची आता ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही संस्था म्हणून नोंद करण्यात आलीये. अनेक ब्लॉग, संतवाणी, निसर्गमित्र, भटकंती, कारागिरी अशा विविध विषयांना वाहिलेले व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ज्ञानभाषातर्फे ‘अ‍ॅक्टिव’ आहेत. मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार आणि वाढीसाठी ७० ग्रुप्समधून सुमारे ६००० मराठी भाषिक मराठीसाठी एकत्र नांदतायेत. विशेष म्हणजे वनारसे फक्त इतरांना सांगून थांबलेले नाहीत तर स्वतच्या लेकीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं म्हणून स्वत हैद्राबादला असताना लेकीसाठी मात्र साताऱ्यातल्या मराठी शाळेची निवड त्यांनी केलीये.

नुकताच पुण्याच्या भोर तालुक्यातल्या एका ग्रामस्थाने वनारसे यांना संपर्क केला. गावात मराठी शाळा असतानाही पालक आपल्या मुलांना गावाबाहेरच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा विचार करतायेत.. तुम्ही या आणि मराठी माध्यमातून शिकण्याचं महत्त्व आमच्या पालकांना सांगा. वनारसे आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या कामाच्या यशाची ही पावती म्हणायला हवी!

bhakti.bisure@expressindia.com