पुणे : पूरक घटक बाधित झाल्यामुळे लेखक आणि वाचक यांच्यातील साहित्य व्यवहार आक्रसला आहे. इंग्रजीच्या आक्रमाणामुळे मराठी भाषाच नव्हे तर संस्कृतीही धोक्यात आली आहे. इंग्रजीतून शिकणारे मराठीत लिहीत नसतील तर, मराठी वाचणारे कोणी उरणार आहेत का? असा मूलभूत प्रश्न ज्येष्ठ समीक्षक डाॅ. सुधीर रसाळ यांनी गुरुवारी उपस्थित केले. मातृभाषा हा अवयव मोडून टाकायचा ठरवला तर इंग्रजी हा कृत्रिम अवयव आपल्याला स्वीकारेल का?, हा खरा प्रश्न आहे याकडे लक्ष वेधून भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता जागृत ठेवण्यासाठी विचारवंतांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. कारण मराठी वाङ्मयीन संस्कृतीच धोक्यात आली, असल्याचे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केले.

‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षा ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विदिशा विचार मंचतर्फे डाॅ. सुधीर रसाळ यांचा विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी रसाळ बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आणि विदिशा विचार मंचच्या ममता क्षेमकल्याणी या वेळी उपस्थित होत्या.

डॉ. रसाळ म्हणाले, ‘लेखकाची साहित्यनिर्मिती वाचकांपर्यंत नेण्यासाठी प्रकाशन संस्था आणि गंथालयांचे जाळे निर्माण केले जाणे आवश्यक आहे. चांगल्या प्रकाशन संस्था बंद होत असून ज्या संस्था सुरू आहेत, त्यांची अवस्था गंभीर आहे. मासिक, साप्ताहिके हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असून कविता, व्यक्तिचित्र, प्रवासवर्णन, ललित लेख हे वाङमय प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. साहित्य प्रकाशित होण्याच्या वाटाच खुंटल्या आहेत.  मुळात मराठीला वाचक वर्ग राहिला आहे का, हा मूळ गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून मराठी ही वाङ्मयीन भाषा राहिल की नाही ही शंका येते.’

‘जीवनाच्या विविध क्षेत्रात इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी भाषा कोंडीत सापडली आहे. मराठी भाषा लुप्त होत चालली असून त्यामुळे मराठी भाषा, वाङ्मय आणि पर्यायाने मराठी संस्कृती धोक्यात आली आहे. महाराष्ट्रातील व्यक्ती त्याच्या स्वभावामुळे मराठी परंपरा चटकन टाकून देत पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करतो. परंतु, सांस्कृतिक संदर्भ जोडले गेले असल्याने जन्मतःच मातृभाषेमुळे आपली ज्ञानभाषा निश्चित झालेली असते, हे विसरून चालणार नाही’, याकडे रसाळ यांनी लक्ष वेधले.  

उत्तम समीक्षक वाचकांची अभिरूची घडवतो. त्यामुळे साहित्य व्यवहाराची उंची वाढते. हे काम रसाळ यांनी समर्थपणे केले आहे. रसाळ यांनी विंदांच्या जीवनवादी कला सिद्धांतावर भाष्य केले आहे. त्यांनी केलेली काव्याची संस्कृतिनिष्ठ समीक्षा ही मराठी भाषा आणि साहित्याला मिळालेली देणगी आहे.  – डॉ. राजा दीक्षित, माजी अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ

Story img Loader