मराठीविषयी चर्चाच फार होते. मात्र, त्या दृष्टीने आवश्यक कामे कमी होत असल्याची खंत व्यक्त करत सर्वच क्षेत्रात मराठीला अग्रक्रम हवा, अशी ठोस भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी पिंपरीत मांडली. मराठीविषयक जवळपास १०० परिपत्रके शासनाने काढली, त्याची दखल कोणी घेत नाही, असे त्यांनी सांगितले.
दिशा सोशल फाऊंडेशन आयोजित ‘मराठी भाषा- काल, आज आणि उद्या’ या विषयावर ते बोलत होते. आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे उपस्थित होते.
कोत्तापल्ले म्हणाले की, भाषा व स्वाभिमान यांच्यात जवळचे नाते आहे. परंपरा बदलण्यासाठी भाषेची आवश्यकता असते. भाषेच्या साहाय्याने सामान्यांचे शोषण व अडवणूक होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजभाषा घडवली आणि राज्यभाषा व्यवहार कोषाची निर्मिती केली. भाषेचे राजकारण आपल्याकडे पूर्वापार चालत आले आहे. मात्र, कोणाच्या राजकारणाचे हत्यार म्हणून मराठीचा वापर होता कामा नये. इंग्रजीसाठी कमालीचा आग्रह धरला जातो आहे. इंग्रजीतून ज्ञानवृध्दी होईलच, असे काही नाही. इंग्रजी शिकावी मात्र माध्यम इंग्रजीच असावे, हा अट्टाहास चुकीचा आहे. ज्या ठिकाणी लाखो गोरगरीब मुले शिकतात, त्या मराठी शाळांबद्दल गांभीर्याने विचार करायला हवा. मराठी शाळा समृध्द झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील.
मुंबईत मराठी शाळा बंद पडत आहेत, त्यामागे अर्थकारण आहे. शाळांच्या जागा मोक्याच्या ठिकाणी आल्या आहेत. त्याद्वारे कोटय़वधी रुपये मिळू शकतात, असे कोत्तापल्ले म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा