‘मराठी वाङ्मयातील सहृदयी समीक्षक आणि साक्षेपी संपादक ही खरं तर प्रा. रा. ग. जाधव यांची ओळख. पण आमच्याशी गप्पा मारताना त्यांचे मोठेपण आपोआप गळून पडायचे. आम्हाला भेटायचे ते मिश्कील टिप्पणी करणारे आणि प्रसंगी लहान मुलाप्रमाणे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करणारे निरागस असे जाधवसर..’  प्रा. रा. ग. जाधव यांच्याशी गेल्या काही वर्षांत घनिष्ठ संबंध आलेले आमदार विजय काळे आणि राजेंद्र मोरे यांनी त्यांच्या आठवणींना अशा शब्दांत उजाळा दिला. जाधवसर आता भेटणार नाहीत ही सल वाटते, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखविली.

वीर मारुती मंदिर ते ओंकारेश्वर मंदिर रस्त्यावरील विजय काळे यांच्या हॉटेल राज येथे दररोज सायंकाळी पाच वाजल्यापासून एक गप्पांची मैफील भरायची. काळे यांच्यासह प्रा. जाधव, प्रसन्न टूर्सचे संस्थापक रायाकाका पटवर्धन आणि शिवसेनेचे माजी गटनेते रमेश बोडके हे चार जण त्या मैफिलीचे स्थायी सदस्य.

चौघांपैकी कोणी एक जण जरी येणार नसला तरी उर्वरित तिघांना त्याची माहिती असायची. ‘या मैफिलीमध्ये गप्पा मारताना जाधवसरांनी केवळ आमची साहित्याची जाण वाढविली नाही, तर वेगवेगळ्या साहित्यिकांचे अनुभव सांगून आमचे जीवन समृद्ध केले. एके दिवशी आम्ही असेच गप्पा मारत होतो, तेव्हा मित्रांसमवेत हॉटेलमध्ये आलेल्या जयदेव गायकवाड यांचे जाधव यांच्याकडे लक्ष गेले. ते दुसऱ्या क्षणी आमच्यापाशी आले आणि खाली वाकून गायकवाड यांनी जाधवसरांना नमस्कार केला,’ अशी आठवण विजय काळे यांनी सांगितली. ‘‘माझ्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांबरोबरच जाधवसरांचे ‘निळे पाणी’ पुस्तक आहे. या पुस्तकाने आम्हा दलित चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली, असे जयदेव गायकवाड यांनी मला सांगितले होते,’’ असेही काळे म्हणाले. युवा पिढीतील लेखक आणि कवी जाधवसरांकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत. त्यांच्याशी जाधवसर हॉटेल राजमध्येच चर्चा करायचे. येणाऱ्या माणसाला त्यांच्या घराचे तीन जिने चढून यायला लागू नये ही त्यामागची सरांची भावना होती, असेही त्यांनी सांगितले.

‘डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि प्रा. रा. ग. जाधव आमचे शेजारी असल्याने आम्हाला मोठा आधार होता. जाधवसर तर मला वडिलांप्रमाणेच होते,’ अशा शब्दांत राजेंद्र मोरे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘‘दाभोलकर यांचा खून झाला त्यादिवशी मी पुण्यात असायला हवे होते, ही सल ते सतत माझ्यापाशी बोलून दाखवायचे. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे हे माझे ज्येष्ठ बंधू.

त्यांच्याबरोबरच मी जाधव यांना सदाशिव पेठेतील घरामध्ये भेटलो होतो. पण, आपल्याला त्यांचा शेजार लाभेल असे तेव्हा कधी वाटले नव्हते. दररोज सकाळी पावणेसहा वाजता जाधवसर फिरायला जायचे. एरवी गोड पदार्थ खाणे जाधवसर टाळत असले तरी त्यांना गोड चहा आवडायचा. शेवटी आजारी पडल्यानंतर मुगाची मऊ खिचडी हाच त्यांचा आहार होता. जाधवसरांच्या निधनामुळे आमचा आधारच गेला,’’ अशी भावना मोरे यांनी व्यक्त केली.

एवढय़ा पैशांचं काय करू?

राज्य सरकारने प्रा. रा. ग. जाधव यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तीन महिन्यांपूर्वी जाहीर केला. पाच लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे असे समजताच ‘आता या वयात एवढय़ा पैशांचं काय करू’, असा प्रश्न जाधव यांनी विचारला होता. िपपरी-चिंचवड साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षांनी माजी संमेलनाध्यक्ष म्हणून दिलेला एक लाख रुपय्ांांचा धनादेश जाधव यांनी साधना ट्रस्टला देणगी दिला होता. हा संदर्भ ध्यानात घेऊन ‘आता हे पैसे तुमच्या उपचारांसाठी ठेवा’, अशी विनंती आमदार विजय काळे यांनी त्यांना केली होती.

Story img Loader