अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला अवघा एक दिवस उरला असताना अध्यक्षांचे भाषण गुरुवारी रात्रीपर्यंत साहित्य महामंडळाकडे पोहोचले नसल्याने महामंडळाला त्याची छपाई अद्याप सुरू करता आलेली नाही. या विलंबामुळे संमेलनातील अध्यक्षीय भाषण साहित्य महामंडळाला वेळेत देण्याची परंपरा यंदा मोडल्याचे स्पष्ट झाले आहे.
िपपरी-चिंचवड येथे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून शनिवारी (१६ जानेवारी) सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण साहित्य महामंडळाकडे गुरुवारी रात्रीपर्यंत पोहोचले नव्हते. साहित्य महामंडळाकडून दरवर्षी संमेलनाध्यक्षांचे भाषण मुद्रित स्वरूपामध्ये प्रसारमाध्यमांना किमान तीन दिवस आधी दिले जाते. या वर्षी मात्र अद्याप भाषणच तयार नसल्यामुळे ते माध्यमांना देणे महामंडळाला शक्य झालेले नाही. महामंडळाचे प्रमुख कार्यवाह हे अध्यक्षीय भाषणाच्या पुस्तिकेचे प्रकाशक-मुद्रक असतात.
‘‘अध्यक्षांकडून भाषणाची प्रत आल्यानंतर साहित्य महामंडळाचे पदाधिकारी ते भाषण वाचतात व नंतर ते छपाईसाठी दिले जाते. मुद्रित स्वरूपातील भाषण प्रसारमाध्यमांकडे किमान तीन दिवस ते कमाल आठवडाभर आधी दिले जाते. अध्यक्षांकडून भाषण मिळाल्यानंतर ते वाचून झाल्यावर तातडीने छपाईसाठी देण्याची तयारी आम्ही ठेवली होती. त्यासाठी आम्ही पदाधिकारी सायंकाळी चार ते रात्री आठपर्यंत वाट पाहात बसून होतो. मात्र, भाषण अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही,’’ असे साहित्य महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी सांगितले. हे भाषण नेमके किती पृष्ठांचे आहे आणि ते डीटीपी स्वरूपात मिळणार की हस्तलिखित आहे हेही अद्याप समजलेले नाही, असेही पायगुडे यांनी स्पष्ट केले.
भाषण तयार आहे..
माझे अध्यक्षीय भाषण तयार आहे. मात्र, आणखी एकदा वाचून घेऊनच ते आमच्याकडे द्या, असे साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुचविले असल्याने ते मी शुक्रवारी (१५जानेवारी) सकाळी महामंडळाकडे सुपूर्द करणार आहे. दुपापर्यंत प्रसार माध्यमांना ते प्रसिद्धीसाठी उपलब्ध होईल, असे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. मूळ भाषण शंभर पृष्ठांचे असून वेगवेगळ्या नकाशांसह ते १३५ पृष्ठांचे होईल. भाषणामध्ये साहित्याच्या वेगवेगळ्या प्रवाहांचा वेध घेतला असून ‘सामथ्र्य व मर्यादा सूत्रावर आधारित संवाद आणि संघर्षवादी सेक्युलर भूमिका’ असे त्याचे शीर्षक आहे. मध्यंतरीच्या वादंगामुळे भाषण तयार करण्यासाठी वेळ लागला, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader