हस्तलिखितांचा इतिहास हा एका अर्थाने दैवदुर्विलासाचा इतिहास आहे. इतिहास लोकांपर्यंत नेणे दुरापास्त झालेले असताना परदेशी लोकांना आपल्या इतिहासामध्ये रस वाटतो आणि या इतिहासाच्या जतनासाठी ते प्रयत्न करतात, ही आनंदाची गोष्ट असल्याचे मत डेक्कन कॉलेजचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी रविवारी व्यक्त केले. दुर्मिळ मराठी हस्तलिखितांची सूची हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतल्यामुळे हस्तलिखितांचे भाग्य उजळेल आणि आपल्याही ज्ञानात भर पडेल, असेही ते म्हणाले.
उत्कर्ष प्रकाशनतर्फे डॉ. अॅन फेल्डहाउस आणि वा. ल. मंजूळ यांनी संपादित केलेल्या ‘मराठी हस्तलिखितांची समग्र सूची’ या प्रकल्पातील पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते झाले. आनंदाश्रम संस्थेच्या विश्वस्त डॉ. सरोजा भाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि प्रकाशक सु. वा. जोशी या वेळी उपस्थित होते.
डॉ. देगलूरकर म्हणाले, पूर्वी आपल्याकडे ज्ञानोपासनेची मौखिक परंपरा होती. नंतर ती लिखित झाली. कागदाचा शोध लागण्यापूर्वी लेखन करण्यासाठी भूर्जपत्राचा वापर केला गेला. विज्ञानाच्या प्रगतीमुळे ध्वनिमुद्रणाचे तंत्र आले. नंतरच्या पिढीमध्ये पांडित्य क्षीण झाले आणि पराक्रम आटला. पण, पूर्व पंडितांनी एवढे काम करून ठेवले आहे त्याचा केवळ मागोवा घेतला, तरी मोठा ज्ञानसाठा लोकांसमोर येऊ शकतो.
डॉ. सरोजा भाटे म्हणाल्या, हस्तलिखिते हा महत्त्वाचा आणि समृद्ध पण दुर्लक्षित ठेवा आहे. महाराष्ट्राबाहेर सुमारे सात हजार मराठी हस्तलिखिते आहेत. दक्षिणेमध्ये तंजावरला २३०० हस्तलिखिते आहेत. इतिहासाची भूते गाडून भविष्याकडे जायचे अशी सध्याची मानसिकता दिसते. पण, इतिहासामध्ये भविष्याचे पदर असतात असे तत्त्वज्ञ सांगतात. १५ व्या शतकातील दुर्मिळ हस्तलिखित हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात तर, पहिले व्याकरणावरील पुस्तक चेन्नईमध्ये आहे. संस्कृतीची सोनपावलं कोठेही उमटतात. मग भूगोलाच्या सीमांनाही मर्यादा पडतात.
डॉ. सदानंद मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. वा. ल. मंजूळ यांनी प्रास्ताविकात सूचीविषयीची माहिती दिली.
हस्तलिखितांचा इतिहास हा एका अर्थाने दैवदुर्विलासाचा इतिहास – देगलूरकर
इतिहास लोकांपर्यंत नेणे दुरापास्त झालेले असताना परदेशी लोकांना आपल्या इतिहासामध्ये रस वाटतो आणि या इतिहासाच्या जतनासाठी ते प्रयत्न करतात, ही आनंदाची गोष्ट असल्याचे मत डेक्कन कॉलेजचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी रविवारी व्यक्त केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-04-2014 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi manuscript history utkarsh prakashan