प्रदर्शनापूर्वीच गाजलेला आणि गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेला बहुचर्चित सैराट पाहण्यासाठी पुण्यात सर्व चित्रपटगृहांमध्ये झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. सैराट लागलेल्या प्रत्येक चित्रपटगृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’च्या पाटय़ा लागल्या आहेत आणि या चित्रपटाची तिकिटे सध्या ‘ब्लॅक ’ने विकली जात आहेत. या चित्रपटाच्या तिकिटांचा काळाबाजार करणारेही पुण्यात जोरात आहेत.
सध्या मोठा प्रतिसाद मिळत असलेल्या सैराटला पुढील आठवडाभरही आगाऊ तिकिट नोंदणीला जोरदार प्रतिसाद मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे हा चित्रपट पाहण्यासाठी विविध चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्सच्या बाहेर मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तिकिट विक्रीची खिडकी उघडल्यानंतर तिकिटांसाठी अक्षरश: उडय़ा पडत आहेत. बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या चित्रपटाला एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांत शहरात बहुपडदा चित्रपटगृह (मल्टिप्लेक्स) सुरू झाल्याने एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे जवळपास शंभर ते दोनशे खेळ दिवसभरात दाखविले जातात. त्यामुळे तिकिटे सहजतेने उपलब्ध होतात. पूर्वी एकपडदा चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यास दिवसभरात त्याचे आठ ते दहा खेळ दाखविले जायचे. त्यामुळे चित्रपटगृहांच्या बाहेर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळायचे.
सैराटला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे चित्रपटाची सर्व तिकिटे आधीच संपत आहेत. तसेच ऑनलाईन बुकिंगलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आयत्यावेळी या चित्रपटाला जाणाऱ्यांना तिकिटे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे चित्रपटगृहांच्या बाहेर या चित्रपटाच्या तिकिटांची काळ्याबाजाराने विक्री करणाऱ्यांचे फावले आहे. साधारणपणे तिकिटाच्या मूळ किमतीपेक्षा दुप्पट-तिप्पट दराने तिकिटांची विक्री सध्या केली जात आहे. काळ्याबाजारात (ब्लॅक) तिकिटे विकणाऱ्यांचा पूर्वी अनेक चित्रपटगृहाच्या परिसरात वावर असायचा. मात्र अलीकडच्या काळात तिकिटांचा काळाबाजार करण्याची गरजच उरलेली नाही. मात्र सैराटच्या तिकिटांची काळ्याबाजारात जोरात विक्री सुरू आहे.
पहिल्याच आठवडय़ात सैराट चित्रपटाचे पुण्यातील विविध बहुपडदा आणि एकपडदा चित्रपटगृहात (सिंगल स्क्रीन) दररोज दोनशे ते सव्वादोनशे खेळ सुरू आहेत आणि काळ्याबाजारात तिकिटे घेणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे.
या संदर्भात सिटीप्राईड मल्टिेप्लेक्सचे प्रोग्रामिंग मॅनेजर शैलेश जोशी ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, ‘नटसम्राट’ आणि ‘कटय़ार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटांना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘बिगबजेट’ हिंदी चित्रपटांच्या तुलनेत सैराटला मिळालेला प्रतिसाद अतिशय जोरदार आहे. चित्रपटातील गाणीदेखील तरुणाईच्या पसंतीस उतरली आहेत. सिटीप्राईड मल्टिप्लेक्सच्या विविध स्क्रीनवर रोज चाळीस ते पन्नास खेळ दाखविले जात असून ऑनलाईन बुकिंगही जोरात आहे. ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून दररोज चार ते साडेचार हजार तिकिटांची विक्री होत आहे. पुढील आठवडाभर या चित्रपटाच्या सर्व खेळांना चांगला प्रतिसाद मिळेल, असेच सध्याचे चित्र आहे.
सैराट चित्रपटाच्या तिकिटांची काळ्याबाजारात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मध्यवस्तीत असलेल्या काही चित्रपटगृहांबाहेर काळ्याबाजारात तिकिट विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. काळ्याबाजारात तिकिट विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
– हेमंत भट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे</strong>