संगीत रंगभूमी हे जगाच्या पाठीवर एकमेव वैशिष्टय़ लाभलेल्या मराठी भाषेतील संगीत नाटकांचे वैभव हिंदी भाषकांसाठी खुले होत आहे. किर्लोस्कर नाटक मंडळीचे प्रमुख अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे ‘सौभद्र’, नाटय़ाचार्य गोविंद बल्लाळ देवल यांचे ‘शारदा’ आणि संगीत रंगभूमीला नवसंजीवनी देणाऱ्या पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे ‘कटय़ार काळजात घुसली’ ही तीन अजरामर संगीत नाटके त्यातील नाटय़पदांसह हिंदीमध्ये रूपांतरित करण्याचे शिवधनुष्य प्रा. वेदकुमार वेदालंकार यांनी पेलले आहे.
प्रा. वेदकुमार वेदालंकार हे मूळचे लातूरचे. त्यांचे वडील आर्य समाजाची विचारधारा मानणारे होते. आपल्या मुलाने वेदाध्ययन करावे ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी माझे नाव वेदकुमार असे ठेवले, असे वेदालंकार यांनी सांगितले. हिंदी विषयामध्ये एम. ए. केल्यानंतर त्यांनी हरिद्वार येथे जाऊन वेदांचे शिक्षण घेत वेदालंकार ही पदवी संपादन केली. ही पदवी हेच उपनाम धारण करीत त्यांनी शासकीय गॅझेटमध्ये आडनाव बदलाची नोंद करून घेतली आहे. १९६१ मध्ये वेदांचे शिक्षण घेऊन महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांनी उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमंहस महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे अध्यापन केले. प्राचार्य म्हणून ते १९९१ मध्ये सेवानिवृत्त झाले. हिंदू पद्धतीनुसार वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी अमलात आणला. वेदालंकार हे पत्नीसह उमरगा येथील इंद्रधनू वृद्धसेवा केंद्रामध्ये वास्तव्यास आहेत.
माझ्या हिंदी अनुवादाची सुरुवात शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ कादंबरीने झाली. सावंत हे मित्र असल्याने छावाच्या अनुवादासाठी भारतीय ज्ञानपीठ संस्थेला त्यांनी माझे नाव सुचविले. या हिंदी अनुवादाच्या १५ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. बालपणापासून संगीत नाटकांचा मी चाहता असून नाटय़संगीत मला आवडते. त्यातूनच संगीत नाटकांचे हिंदी रूपांतरण करण्याचे निश्चित केले. ‘सौभद्र’, ‘शारदा’ आणि ‘कटय़ार काळजात घुसली’ या तीन नाटकांचा अनुवाद करताना त्यातील पदे हिंदीमध्ये नेतानाही मूळ चालीनुसार म्हणता येतील अशीच ठेवली आहेत. आवश्यक तेथे ब्रज भाषेचाही वापर केला असल्याचे वेदालंकार यांनी सांगितले. ‘कटय़ार’चा हिंदी नाटकाचा रंगभूमीवर प्रयोग करावा, या संदर्भात मी राहुल देशपांडे यांच्याशी बोललो असल्याचे त्यांनी सांगितले. वेदालंकार यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांची टीका असलेल्या ‘यजुर्वेदा’चा हिंदीतून मराठी अनुवाद केला असून सध्या ‘सामवेदा’च्या अनुवादाचे काम सुरू आहे.
प्रा. वेदालंकार यांची अनुवाद साहित्य संपदा
मराठी संगीत नाटकांचे वैभव हिंदी भाषकांसाठी खुले
तीन अजरामर संगीत नाटके त्यातील नाटय़पदांसह हिंदीमध्ये रूपांतरित करण्याचे शिवधनुष्य प्रा. वेदकुमार वेदालंकार यांनी पेलले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-02-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi musical drama vedalankar open hindi