मराठी भाषेमध्ये कसदार लिहिती-वाचती पिढी घडावी यासाठी भाषा संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा ऑलिंपियाड ही अभिनव स्पर्धा घेण्यात येत आहे. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेची पहिली फेरी ११ ऑक्टोबर रोजी कोथरूड येथील भारतीय विद्या भवन येथे होणार आहे.
भाषेचे जतन आणि संवर्ध करण्यासाठीची मूलभूत पातळीवरची दीर्घकालीन योजना म्हणून मराठी भाषा ऑलिंपियाड स्पर्धेकडे पाहिले जावे ही अपेक्षा आहे. जाणता वाचक, जिज्ञासू अभ्यासक आणि कसदार लेखक घडविण्याच्या दृष्टीने भाषा संस्थेने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात भाषेच्या गोडीचे बीज रुजावे या दृष्टीने या स्पर्धेची आखणी करण्यात आली असल्याची माहिती भाषा संस्थेच्या अध्यक्षा स्वाती राजे यांनी मंगळवारी दिली.
हा खेळ इयत्ता पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमातील संकल्पनांवर आधारित असून ज्ञान, आकलन, उपयोजना आणि कौशल्य या चार घटकांचा विचार करून त्याची बांधणी करण्यात आली आहे. या वर्षी हा खेळ पुणे शहरात घेण्यात येत असून पुढील वर्षीपासून संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचा संस्थेचा मानस आहे. भाषा परिचय ही पहिली पायरी असून या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना भाषा प्रगती या पुढील परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या फेरीत विद्यार्थ्यांच्या भाषिक आकलनाबरोबरच भाषण, संवाद आणि नवनिर्मिती क्षमता या निकषांवर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. यातून उत्कृष्ट भाषिक समज असलेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना भाषा संस्थेच्या भाषा प्रावीण्य प्रकल्प कार्यशाळेत सहभागी करून घेतले जाणार असल्याचेही स्वाती राजे यांनी सांगितले.
मराठी भाषा ऑलिंपियाड परीक्षेसाठी आतापर्यंत मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील पाचशे विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रशस्तपिंत्रक तर अंतिम फेरीतील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना खास बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ३० सप्टेंबपर्यंत भाषा फाउंडेशन, सी-९, रेणुका कॉम्प्लेक्स, कॅनरा बँक इमारत, जंगली महाराज रस्ता, पुणे ४ (दूरध्वनी क्र. २५५३८१८१) या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘कथायात्रा’ची रक्कम दुष्काळ निधीसाठी
भाषा संस्थेतर्फे गेल्या ८ वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी कथायात्रा महोत्सव हा कथेला वाहिलेला महोत्सव आयोजित केला जात आहे. राज्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर यंदा हा महोत्सव रद्द करून यासाठीची रक्कम दुष्काळ निधीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती स्वाती राजे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा