परिसंवाद, कविसंमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल घुमान येथे ३ ते ५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनुभवता येणार आहे. या संमेलनाची कार्यक्रम पत्रिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शनिवारी जाहीर केली.
संमेलनाची सुरुवात ३ एप्रिलला ध्वजारोहण आणि ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक गुरुदयालसिंग यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. कविसंमेलने, परिसंवाद, अभिरूप न्यायालय, संत नामदेवांच्या रचनांवर नृत्याविष्कार असे कार्यक्रम ३ ते ५ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत. लोहोर येथील कवयित्री सलीमा हश्मी यांचा सत्कार ४ एप्रिलला करण्यात येणार आहे. ५ एप्रिलला दुपारी साडेचार वाजता संमेलनाचा समारोप होईल. समारोप समारंभासाठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक रेहमान राही, ‘नवा जमाना’चे संपादक जितेंद्र पन्नू उपस्थित राहणार आहेत. प्रकाशकांच्या मागण्यांना तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे, असे वैद्य यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रम पत्रिका
*३ एप्रिल : ध्वजारोहण, ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन, संमेलनाचे उद्घाटन, साहित्य व ललितकला अनुबंध या विषयावर परिसंवाद, संत नामदेवांच्या रचनांवर आधारित ‘नृत्यबानी’ हा कार्यक्रम.
*४ एप्रिल : सलीमा हश्मी यांचा सत्कार, ‘पंजाब केसरी’चे संपादक विजय चोप्रा यांची मुलाखत, कवी कट्टय़ाचे उद्घाटन, संत साहित्य देव्हाऱ्यातच, व्यवहारांत का नाही? या विषयावर परिसंवाद, अभिरूप न्यायालय – दृकश्राव्य माध्यमातील संहितालेखन, भारतीय भाषांतील स्नेहबंध व अनुवाद या विषयावरील परिसंवाद, मला प्रभावित करणारे लेखन या विषयावरील कार्यक्रम, निमंत्रितांचे कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम
*५ एप्रिल : डॉ. गणेश देवी यांची मुलाखत, आधुनिक तंत्रज्ञान आणि मुद्रित साहित्याचे भवितव्य यावर परिसंवाद, कविसंमेलन, समारोप.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा