अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपद निवडणुकीची रणधुमाळी एकीकडे सुरू होत असतानाच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यामध्ये व्यग्र होत आहेत. अमृतसर येथे १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये घुमान येथील साहित्यसंमेलनामध्ये होणारा कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे.
संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबातील घुमान येथे आगामी ८८वे साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्यास १३ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून ही मुदत २३ सप्टेंबपर्यंत आहे. एकीकडे ही निवडणूक प्रक्रिया सुरू होत असतानाच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी पुढच्या तयारीला लागणार आहेत. १८ सप्टेंबर रोजी अमृतसर येथे साहित्य महामंडळाची बैठक होणार असून, त्यामध्ये घुमान संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा ठरविली जाणार आहे. तब्बल १४ वर्षांनंतर महाराष्ट्राबाहेर होत असलेले हे संमेलन सर्वार्थाने वेगळे ठरावे यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
अमृतसरमधील हॉटेल नमस्कार येथे १८ सप्टेंबर रोजी महामंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये संमेलनातील परिसंवादाचे विषय, संभाव्य वक्ते, उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कविसंमेलनात सहभागी होणारे कवी, ग्रंथिदडी आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम यासंबंधीची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी महामंडळ सदस्य घुमान येथे भेट देऊन संमेलन स्थळ, ग्रंथप्रदर्शन आणि कार्यक्रमांच्या ठिकाणांची पाहणी करणार आहेत. २१ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील महाराष्ट्र मंडळामध्ये मराठी बांधवांसमवेत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी महामंडळ अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, स्वागताध्यक्ष भारत देसडला, संयोजक संजय नहार, गिरीश गांधी आणि श्रीराम गीत हे पुण्याहून, तर महामंडळाचे अन्य सदस्य थेट अमृतसर येथे सहभागी होत आहेत.

Story img Loader