परिसंवाद, कविसंमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनुभवता येणार आहे. ३ ते ५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या या संमेलनाची कार्यक्रम पत्रिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शनिवारी जाहीर केली. साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचे प्रक्षेपण दूरचित्रवाणी वाहिन्यांवर करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असल्याचे डॉ. वैद्य यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संमेलनाची सुरुवात ३ एप्रिलला ध्वजारोहण आणि ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक गुरुदयालसिंग यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, फ. मुं. शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. कविसंमेलने, परिसंवाद, अभिरूप न्यायालय, संत नामदेवांच्या रचनांवर नृत्याविष्कार असे कार्यक्रम ३ ते ५ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत. लाहोर येथील कवयित्री सलीमा हश्मी यांचा सत्कार ४ एप्रिलला करण्यात येणार आहे. ५ एप्रिलला दुपारी साडेचार वाजता संमेलनाचा समारोप समारंभ होणार आहे. समारोप समारंभासाठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक रेहमान राही, ‘नवा जमाना’चे संपादक जितेंद्र पन्नू, डॉ. मोरे, फ. मुं. शिदे आदी उपस्थित राहणार आहेत.
 संमेलनाच्या किमान उद्घाटन सोहळा आणि समारोप समारंभाचे प्रक्षेपण दूरचित्रवाणी वाहिन्यांवर करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती डॉ. माधवी वैद्य यांनी दिली. त्याचप्रमाणे प्रकाशकांच्या मागण्यांना तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे, असेही त्या म्हणाल्या. संमेलनाच्या वेळी मांडण्यात येणारे ठराव २७ मार्चपर्यंत परिषदेच्या कार्यालयात द्यायचे आहेत.
कार्यक्रम पत्रिका
३ एप्रिल : सकाळी ९.३० – ध्वजारोहण, सकाळी १० – ग्रंथदिंडी, दुपारी २.३० – ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन, दुपारी ४ – संमेलनाचे उद्घाटन (मुख्य मंडप), सायं. ६.३० – परिसंवाद, विषय – साहित्य व ललितकला अनुबंध, सहभागी – डॉ. राजन कुलकर्णी, अनुराधा कुबेर, स्नेहल दामले, सायं ७ – संत नामदेवांच्या रचनांवर आधारित ‘नृत्यबानी’ हा कार्यक्रम, सादरकर्त्यां – डॉ. स्वाती दैठणकर
४ एप्रिल : सकाळी ९.३० – सलीमा हश्मी यांचा सत्कार, सकाळी १० – ‘पंजाब केसरी’चे संपादक विजय चोप्रा यांची मुलाखत, मुलाखतकार -सुधीर गाडगीळ, (मुख्यमंडप), कवी कट्टय़ाचे उद्घाटन, हस्ते – फ. मुं. शिंदे , सकाळी ११ – परिसंवाद, विषय – संत साहित्य देव्हाऱ्यातच, व्यवहारांत का नाही?, सहभागी – विनय सहस्रबुद्धे, डॉ. रामचंद्र आर्वीकर, डॉ. वि. मा. पागे आदी , अभिरूप न्यायालय – दृकश्राव्य माध्यमातील संहितालेखन, सहभागी – रामदास फुटाणे, संजय मोने, मोहन जोशी, रसिका देशमुख, सोनाली कुलकर्णी, राजीव खांडेकर, दुपारी २.३० – परिसंवाद, विषय – भारतीय भाषांतील स्नेहबंध व अनुवाद, सहभागी – उमा कुलकर्णी,  डॉ. अशोक पवळेकर, भालचंद्र जयाशेट्टी आदी, ‘मला प्रभावित करणारे लेखन’, सहभागी – उषा वैरागकर, गुरुमितसिंग बग्गा, डॉ. ऋषिकेष कांबळे, डॉ. अनुपमा उजागरे आदी , दुपारी ४ – निमंत्रितांचे कविसंमेलन, सहभाग – फ. मुं. शिंदे, संदीप खरे, डॉ. अनिल कांबळी, तन्वीर सिद्दिकी आदी, सायं ५.३० – सांस्कृतिक कार्यक्रम, सादरकर्त्यां – निकिता मोघे, सहभाग – फय्याज, अवधूत गुप्ते, सावनी रवींद्र, शर्वरी जमेनिस, अश्विनी एकबोटे, उपस्थिती  – केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर
५ एप्रिल : सकाळी ११ – डॉ. गणेश देवी यांची मुलाखत, मुलाखतकार – अरुण जाखडे, डॉ. सुषमा करोगल, परिसंवाद – आधुनिक तंत्रज्ञान आणि मुद्रित साहित्याचे भवितव्य, सहभागी – डॉ. केशव देशमुख, श्रीपाद अपराजीत, माधवराजे चौसाळकर, दुपारी २.३० – निमंत्रितांचे कविसंमेलन, दुपारी ४.३० – समारोप.

Story img Loader