पंजाब येथील गुरदासपूर जिल्ह्य़ातील घुमान येथे यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. घुमान हे पंजाबच्या इतिहासातील सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. संत नामदेवांचे महाराष्ट्रातील अपूर्व कार्य सर्वश्रुत आहे. पण, त्यांचे पंजाबातील वास्तव्य, शिखांच्या धर्मग्रंथात समाविष्ट असलेली त्यांची पदरचना आणि पंजाबसह उत्तर भारतात त्यांनी केलेले सांस्कृतिक प्रबोधन या कार्याची माहिती मराठी मनाला जेवढी असावयास हवी तेवढी झालेली नव्हती, असा काहीसा आरोप काही काळापूर्वी केला जात असे. पण, साहित्य संमेलन घुमान येथील करावयाचे ठरवून मराठी मनाने आपल्या प्रगल्भतेची जाणीव करून दिली आहे असे निश्चितपणे वाटते. ७००हून अधिक वर्षांपूर्वी संत नामदेव भागवत धर्माची पताका घेऊन सामाजिक-सांस्कृतिक ऐक्य व सर्वधर्मसमभाव रुजवत ‘हिंदूू पुजे देहुरा मुसलमान मसीत – नामे सोई सेविया जहाँ ना देहुरा ना मसीत’ असे म्हणत पंजाबधील घुमान येथे पोहोचले व जवळजवळ वीस वर्षे येथे वास्तव्य करून १३ व्या शतकातील इस्लामच्या आक्रमणापासून भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी व हिंदूू-मुस्लीम एकता प्रस्थापनेसाठी कार्य करीत राहिले. पंजाबच्या जनतेला आपल्या अभंगवाणीद्वारे मानसिक आधार देऊन समाजात ऐक्य रुजविण्याचे जे थोर कार्य त्यांनी केले ते शब्दातीत आहे. म्हणूनच संत नामदेव हे महाराष्ट्रीय न राहता शीख बांधवांचे बाबा नामदेव झाले.
घुमान येथे नामदेवांचे स्मारक मंदिर आहे. ते गुरुद्वारा बाबा नामदेवजीकी समाधी या नावाने ओळखले जाते. बाबा नामदेवांची ही समाधी ही राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. शीख धर्मीयांत मूर्तिपूजा वज्र्य आहे. परंतु, घुमान येथे संत मानदेवांच्या मूर्तीचे पूजन केले जाते. संत नामदेवांनी जेथे बसून तपश्चर्या केली, त्या ठिकाणाला तपीयाना असे म्हणतात. नामदेवांनी भागवत धर्म आणि नामभक्तीचा संदेश पंढरपूरपासून पंजाबपर्यंत नेला. म्हणूनच ते निर्गुण संत परंपरेचा आद्यत्व करणारे ठरले. नामदेवांनी जेथे राहून महान कार्य केले, त्या घुमानमध्ये होणारे संमेलन देखील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरावे हीच मनीषा.

Story img Loader