महाराष्ट्राची सीमा ओलांडून संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबातील घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांच्या शनिवारी (१४ फेब्रुवारी) होणाऱ्या बारामती दौऱ्यामध्ये भेट घेऊन त्यांना निमंत्रण द्यायचे, की दिल्ली येथे जाऊनच त्यांना निमंत्रित करायचे हे अद्यापही निश्चित झालेले नाही. पंतप्रधान उपस्थित राहू शकले तर ती मराठी बांधवांसाठी आनंदाची गोष्ट ठरेल. त्यामुळेच घुमान येथील संमेलनाला पंतप्रधानांना निमंत्रण देण्याचा मनोदय असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी गुरुवारी सांगितले. यापूर्वी कऱ्हाड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या हस्ते झाले होते.
संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनावरील प्रकाशकांचा बहिष्कार मागे घेतला गेला असून आतापर्यंत २० प्रकाशकांसाठी प्रदर्शनातील दालनासाठी अर्ज नेले असल्याची माहिती भारत देसडला यांनी दिली. संमेलनास जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाडय़ांना ‘संत नामदेव’ आणि ‘गुरु नानक’ ही नावे देण्यात येणार आहेत. आतापर्यंत १४०० साहित्यप्रेमींनी प्रतिनिधी शुल्क भरून नोंदणी केली असून मराठीप्रेमींच्या विनंतीनुसार प्रतिनिधी नोंदणीची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ९६६५०५५०५५ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 साहित्यिक आपल्या भेटीला
साहित्य संमेलनाबाबात जागरुकता घडविण्याच्या उद्देशातून ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत विविध शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालयांमार्फत दोन लाख कुटुंबांपर्यंत निमंत्रणे पाठविण्यात येणार आहेत. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशाला येथे शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी बारा वाजता कवी संदीप खरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.