दत्ता जाधव, लोकसत्ता
पुणे : राज्यातील एकूण हळद लागवडीखालील क्षेत्रापैकी निम्याहून अधिक क्षेत्र एकटय़ा हिंगोली जिल्ह्यात एकवटले आहे. यंदा राज्यातील हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र ८४ हजार ६६ हेक्टर आहे, त्यापैकी एकटय़ा हिंगोली जिल्ह्यातील क्षेत्र ४९ हजार ७६४ हेक्टर इतके आहे. हिंगोलीसह नांदेड, वाशिम, यवतमाळ आणि परभणी या जिल्ह्यांनीही आघाडी घेतली असून, आता सांगली, साताऱ्याची मक्तेदारी मोडीत निघाली आहे.
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील हळद संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार राज्यात हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र ८४ हजार ६६ हेक्टर आहे. त्यापैकी एकटय़ा हिंगोलीत ४९ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड झाली आहे. हे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत निम्याहून अधिक आहे. त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यात १३ हजार १३१ हेक्टर, वाशिममध्ये ४ हजार १४९ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात ३ हजार ७३६ हेक्टर, परभणीत ३ हजार १५१ हेक्टर, बुलढाण्यात १ हजार ७६३ हेक्टर, जालन्यात १ हजार ७७ हेक्टर, जळगावात ९८४ हेक्टर, चंद्रपूरमध्ये ७८७ हेक्टर, गोंदियात ३८२ हेक्टर भंडाऱ्यात ३७५ हेक्टर आणि नागपुरात ३५१ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.
सांगली, साताऱ्याची पिछाडी
आजवर हळदीसाठी प्रसिद्ध असलेला सांगली जिल्हा हळदीच्या लागवड क्षेत्राचा विचार करता अकराव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. सांगलीत एकूण ७७४ हेक्टरवर तर साताऱ्यात १ हजार ७८८ हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. मराठवाडय़ात वेगाने हळद लागवडीखालील क्षेत्र वाढत असल्यामुळे सांगली, साताऱ्याची हळद लागवडीतील मक्तेदारी मोडीत निघाली आहे. सांगली, साताऱ्यात द्राक्ष, डािळबसारखी इतर फळ पिकांची लागवड वाढल्याचाही हा परिणाम आहे.
बाजारपेठेच्या विस्ताराचा झाला फायदा
सांगलीची हळदीची बाजारपेठ जगात प्रसिद्ध आहे. सांगलीसह सातारा, मराठवाडा आणि कर्नाटकच्या सीमाभागातील हळद विक्रीसाठी सांगलीत येत होती. आता िहगोली, वसमत, वाशिम, नांदेड येथे हळदीचे सौदे होऊ लागले आहेत. बाजारपेठ उपलब्ध झाल्याने आणि सरासरी नऊ हजार ते दहा हजार प्रति िक्वटल दर मिळत असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात हळदीचे क्षेत्र झपाटय़ाने वाढत आहे.
मराठवाडा आणि विदर्भात आजवर प्रामुख्याने कापूस, सोयाबीन आणि कडधान्य पिकांची लागवड केली जायची. पण, अलीकडे नैसर्गिक आपत्तींमुळे सोयाबीन पीक अडचणीत आले आहे. कापसाची उत्पादकता बोंडअळीमुळे अत्यंत कमी झाली आहे. शिवाय कापूस वेचणीच्या वेळी अवकाळी पावसाची भीती असतेच. कडधान्यांची अवस्था अशीच आहे. त्यामुळे हळदीचे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. जमिनीखाली हळदीच्या कंदाची वाढ होत असल्यामुळे अतिवृष्टी, पूर किंवा गारपिटीचा थेट फटका बसत नाही, फार तर उत्पादकता कमी होणे किंवा कंदकुज काही प्रमाणात होते. परिणामी नुकसानीचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकरी हळदीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरच्या तुलनेत हळदीचे क्षेत्र अत्यंत वेगाने विदर्भ, मराठवाडय़ात वाढत आहे.
– डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज (सांगली)