लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार, अमानुष हत्या तसेच हिंदू मंदिरावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि तेथील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा या प्रमुख मागणीसाठी चिंचवड येथे सकल हिंदू समाजाने रविवारी मोर्चा काढला.

सकल हिंदू समाजाच्यावतीने चिंचवड येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकापासून सकाळी साडे दहा वाजता या मोर्चास प्रारंभ झाला. त्यामध्ये पिंपरी- चिंचवड शहरासह, देहूगाव, देहूरोड,आळंदी, हिंजवडी येथील नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, संघटना, देवस्थान, मंदिर समित्या, संस्था, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, गणेश मंडळे, प्रतिष्ठाने यांचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मोर्चात महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता. तिरंगा, भगवे ध्वज तसेच विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी भगव्या टोप्या, फेटे आणि गळ्यात भगवे मफलर परीधान करून सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात भारत मातेचा जयघोष करीत घोषणा देण्यात आल्या.

आणखी वाचा- Sunil Tatkare : महायुतीत मिठाचा खडा! भाजपा कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्याने तटकरेंचा संताप; म्हणाले, “आपल्या एकतेला गालबोट…”

बांगलादेशामध्ये हिंसक आंदोलनातून सत्तांतर झाले आणि तेथील हिंदू, जैन, बौद्ध अल्पसंख्य समाज विनाकारण भरडला गेला. हिंदू, जैन, बौद्धांवर अमानुष हल्ले, अत्याचार, क्रूर हत्या सुरू आहेत. हे थांबविण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा. नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार (सीएए) बांगलादेशामधून आलेल्या हिंदू, जैन, बौद्धांना भारतीय नागरिकता देण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी. पुणे जिल्ह्यात किती रोहिंग्या मुसलमान घुसखोर, बांगलादेशी मुसलमान घुसखोर वास्तव्यास आहेत, याचे सर्वेक्षण तातडीने करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सह मंत्री शंकर गायकर यांनी केली.