बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी झाली.या हत्येला जवळपास २६ दिवसांचा कालावधी झाला आहे.या संपूर्ण कालावधीत संशयित आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले,सुधीर सांगळे यांच्यासह अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे.तर आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.तसेच या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील ठिकठिकाणी मोर्चे काढून निषेध नोंदविला जात आहे.
हेही वाचा >>> महापालिका निवडणुका तातडीने घेण्याची मागणी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडून याचिका
त्याच दरम्यान आज पुण्यातील लाल महाल ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या मोर्चाला सुरुवात झाली असून या मोर्चात संतोष देशमुख यांच्या कुटुंबांतील सदस्य सहभागी झाले होते.तसेच यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी लाल महालमधील जिजाऊ च्या पुतळ्यास अभिवादन देखील केले. मनोज जरांगे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे यांचा सह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच पुणे जिल्हय़ातील विविध भागातील नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरोपी वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे,मुख्यमंत्री साहेब धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या,कर्तव्यात कसूर करणार्या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे,मु.पो.बिहार (बीड) या आशयाचे फलक घेऊन नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे.