महागाई भत्त्याची ३५ महिन्यांची थकबाकी रोखीने द्यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी  कर्मचारी आणि जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे १६ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
केंद्राप्रमाणे वाहतूक व शैक्षणिक भत्ता लागू करावा, पाच दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचे वय ६० करावे, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तया त्वरित कराव्यात, सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार आगाऊ वेतनवाढीबाबत त्वरित निर्णय घ्यावा, या प्रमुख मागण्या राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. या देय मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आजतागायत संघटनेने वेळोवेळी सनदशीर मार्गाने धरणे आंदोलन, निदर्शने, काम बंद आंदोलन, संप करूनही सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता राज्यभरातील कर्मचाऱ्यांचा १६ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र जगताप यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

Story img Loader