जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेकडून मिळणारी सेवा जनरल प्रॅक्टिशनर्सना त्यांच्या क्लिनिकच्या दारात उपलब्ध व्हावी तसेच या सेवेसाठी शुल्क आकारताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश लक्षात घेतले जावेत, या प्रमुख मागण्यांसाठी डॉक्टर्स २७ जूनला पालिकेवर मोर्चा काढणार आहेत.
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’, ‘जन आरोग्य मंच’ आणि ‘जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. माया तुळपुळे, ‘जन आरोग्य मंच’चे निमंत्रक डॉ. शेखर बेंद्रे, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील पायगुडे या वेळी उपस्थित होते.
महानगरपालिकेने ‘पास्को एनव्हायर्नमेंटल सोल्युशन्स’ या कंपनीला जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट दिले आहे. रुग्णालये, रक्तपेढय़ा व वैद्यकीय प्रयोगशाळांचा कचरा दारात जाऊन गोळा केला जातो. तर जनरल प्रॅक्टिशनर्ससाठी ठराविक ‘कलेक्ट पॉइंट्स’वरून कचरा उचलला जातो. मात्र या कलेक्ट पॉइंट्सवर डॉक्टरांनी कंपनीच्या गाडीची वाट पाहात थांबणे अव्यवहार्य असल्याचे तसेच यासाठी आकारले जाणारे शुल्कही अधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
‘पास्को एनव्हायर्नमेंटल सोल्युशन्स’चे संचालक प्रदीप मुळे म्हणाले, ‘‘कंपनीतर्फे पुण्यातील २२०० जनरल प्रॅक्टिशनर्स आणि ६५० हून अधिक रुग्णालयांना जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाची सेवा दिली जाते. सध्या कंपनीच्या सात गाडय़ा हा कचरा उचलण्याचे काम करतात. जनरल प्रॅक्टिशनर्सना महिन्याला २४२ रुपये शुल्क आकारले जाते. दारापर्यंत जाऊन सेवा द्यायची असेल तर खर्चही अधिक येतो त्यामुळे या शुल्कात दारात जाऊन जैववैद्यकीय कचरा उचलणे अवघड आहे.’’

Story img Loader