विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी बेमुदत संप पुकारला असून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीनंतर लाभ देण्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. २००५ आणि २००८ मध्ये सेवानिवृत्ती योजनेसंदर्भात काढलेल्या शासकीय अध्यादेशाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सध्या ४ हजार रुपये मानधन आणि मदतनिसांना २ हजार रुपये मासिक मानधन दिले जाते, त्यामध्ये वाढ करावी. सध्या दरवर्षी १ हजार रुपये भाऊबीज भेट दिली जाते. त्याऐवजी एक महिन्याच्या मानधनाएवढी रक्कम बोनस म्हणून देण्यात यावी, सेवासमाप्तीनंतर एकरकमी लाभ द्यावा, कर्मचाऱ्यांना मे महिन्याची सुट्टी द्यावी, त्यांना आजारपणाची पगारी सुट्टी द्यावी, अंगणवाडी प्रकल्पांचे खासगीकरण करण्याचे धोरण रद्द करावे, अशा कृती समितीच्या मागण्या आहेत. या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. आंदोलनाचा भाग म्हणून अंगणवाडय़ांच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनाचा भाग म्हणून बुधवारी (८ जानेवारी) मुंबई येथे आझाद मैदानावर कर्मचारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा