पुणे शहराच्या प्रारुप विकास आराखडय़ात ज्या अनेक चुका झाल्या आहेत, त्यांचा फटका जुन्या पुण्यातील लाखो रहिवाशांना बसणार असून या चुका दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (१२ जून) महापालिकेवर मोर्चा नेण्यात येणार आहे. भाडेकरू, घरमालक, वाडय़ांमधील रहिवासी तसेच वाडे विकसित करत असलेले विकसक या मोर्चात सहभागी होणार आहेत.
काँग्रेसचे प्रदेश सचिव, नगरसेवक संजय बालगुडे यांनी सोमवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. विकास आराखडय़ात अनेक गंभीर चुका झाल्यामुळे त्या दुरुस्त होणे गरजेचे आहे. वाडय़ांच्या विकासासाठी अडीच एफएसआय देणे आवश्यक असताना तो दीड करण्यात आला आहे आणि ही मुद्रणातील चूक असल्याचे सांगितले जात आहे. रस्तारुंदी करून ज्या जागा ताब्यात घेतल्या गेल्या त्याच जागांवर पुन्हा रस्तारुंदी दाखवण्यात आली आहे, तसेच सार्वजनिक हिताची अनेक आरक्षणे उठवण्यात आली आहेत. या सर्व बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे बालगुडे यांनी सांगितले.
महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून बुधवारी दुपारी बारा वाजता मोर्चाला प्रारंभ होईल.