‘व्यंगचित्रे साहित्यप्रकारात मोडत नाहीत हा काही साहित्य संस्थांचा असलेला गैरसमज आता दूर झाला आहे. साहित्य संमेलनांचे चित्र बदलले असून त्यात आता व्यंगचित्रांचाही समावेश होताना दिसतो. उशिरा का होईना पण शहाणपण सुचल्याचे हे लक्षण आहे,’ अशी भावना ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केली. पंचविसाव्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. मंदा खांडगे, महाराष्ट्र राष्ट्रभाषा समितीचे संचालक ज. गं. फगरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कार्याध्यक्ष नवीन इंदलकर, कार्यकारी विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी, कोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी, कार्यवाह सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.
व्यंगचित्रांची जाण मोठय़ा माणसांपेक्षा लहान मुलांना अधिक असते असे सांगून बालसाहित्य अधिकाधिक निर्माण व्हायला हवे अशी अपेक्षा तेंडुलकर यांनी व्यक्त केली. डॉ. खांडगे म्हणाल्या, ‘‘बालसाहित्य हे साहित्यप्रकारात अजूनही उपेक्षित समजले जाते. बालकुमार साहित्य संस्थेने या बाबीवर लक्ष केंद्रित करायला हवे. लहान मुलांकडून नक्की किती साहित्य वाचले जाते याचा अभ्यास व्हायला हवा. बालसाहित्याची समीक्षा होणेदेखील आवश्यक आहे.’’
संस्थेला स्थैर्य येण्यासाठी कार्यालयाची आवश्यकता असते, असे डॉ वैद्य यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या संमेलनाला कार्यालय उपलब्ध झाल्यामुळे ही संस्था अधिक जोमाने कार्य करू लागेल, असे त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा