पिंपरी : शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पमधील वाहनमुक्त उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे नवीन ग्राहकांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारपेठेतील रस्ता कायमस्वरूपी पादचारी मार्ग करण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यानुसार पिंपरी बाजारपेठ वाहनमुक्त करणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
शहरातील सर्वांत गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या पिंपरी बाजारपेठेत वाहनमुक्त दिनाचे आयोजन करण्यात आले होते. येथील संपूर्ण रस्ते दोन दिवस सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. या उपक्रमानंतर आयुक्तांनी व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. वाहतूक पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील, माजी नगरसेवक डब्बू आसवानी, दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी नीरज चावला, पुरुषोत्तम बोधवानी, शहरविकास तज्ज्ञ प्रसन्न देसाई, आशिक जैन यांच्यासह स्थानिक दुकानदार उपस्थित होते.
दुकानदार संघटनांनी महापालिकेच्या वतीने ३० आणि ३१ मार्च रोजी पुन्हा वाहनमुक्त उपक्रम राबविण्यात यावा, बाजारपेठांचा मार्ग कायमस्वरूपी पादचारीमार्ग व्हावा, अशी मागणी केली. त्यावर आयुक्त सिंह म्हणाले, ‘वाहनमुक्त दिनासारखे उपक्रम यशस्वी होण्यासाठी समाजातील नागरिकांचा सकारात्मक पाठिंबा महत्त्वाचा असतो. दिल्ली येथील चांदणी चौकातील पादचाऱ्यांच्या परिवर्तनातून तुम्ही पाहिलेले चित्र येथे वास्तवात उतरू शकते. चांगले बदल होण्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी समुदायाचा पाठिंबा आवश्यक असून विचारविनिमय करून यावर मार्ग काढण्यात येईल. उपाययोजना करून पिंपरी बाजारपेठ वाहनमुक्त केली जाईल.’
अभिनेत्री अभिज्ञा भावे यांनी रस्ता सुरक्षिततेचे फायदे अधोरेखित केले. ‘जागतिक शहरांमधील बाजारपेठा आकर्षक आहेत. त्या आपल्याला मुक्तपणे चालण्याची आणि खरेदी करण्याची संधी देतात. पिंपरी चिंचवड या दिशेने पावले उचलत असेल, तर आपण त्याचे समर्थन केले पाहिजे’, असे त्या म्हणाल्या.
शहरविकास तज्ज्ञ आशिक जैन यांनी चाचणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिझाईन्स सादर करुन सुरू असलेल्या प्रभावी मूल्यांकन अभ्यासाची रुपरेषा सादर केली. यामध्ये शहरी गतिशीलता आणि प्रकल्प विभागाच्या देखरेखीखाली येणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि भागधारकांच्या अभिप्रायावरील माहिती तसेच महानगरपालिकेच्या पुढील महत्वाकांक्षी उपक्रमांची माहिती दिली.
आयटीडीपी इंडियाचे प्रांजल कुलकर्णी म्हणाले, ‘जेव्हा बाजारपेठा वाहनांना नव्हे तर लोकांना सेवा देतात, तेव्हा बाजारपेठा भरभराटीला येतात. या उपक्रमानंतर सुरुवातीच्या निरीक्षणांमध्ये हवा आणि ध्वनी प्रदूषणामध्ये लक्षणीय घट दिसून आली असून त्याच्या तपशीलवार परिणामांची माहिती लवकरच समोर येईल’.
ग्राहकांमध्ये २० टक्के वाढ
वाहनमुक्त उपक्रमादरम्यान पिंपरी बाजारपेठेत नवीन ग्राहकांमध्ये २० टक्के वाढ झाली. वाहनमुक्तीमुळे व्यवसायात वाढ झाली आहे. ध्वनी, वायुप्रदूषण आणि वाहतूक कोंडी दूर झाल्यानंतर नागरिक बाजाराकडे आकर्षित होतात, असे माजी नगरसेवक डब्बू आसवानी यांनी सांगितले.