मार्केट यार्ड बाजारपेठेतील इमारती जुन्या झाल्या असून या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. या इमारतींच्या जागी नवीन इमारती बांधण्याची योजना असल्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचप्रमाणे येथील फूलबाजार वातानुकूलित करून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या पायाभूत सुविधा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विखे-पाटील यांनी फूलबाजाराला भेट देऊन तेथील व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. ते म्हणाले, मार्केट यार्ड येथील फूलबाजार वातानुकूलित करण्यात येणार आहे. अ‍ॅमस्टरडॅम आणि हॉलंड या देशांमध्ये आहेत त्याच दर्जाच्या पायाभूत सुविधा गुलटेकडी येथील फूलबाजारामध्ये देण्यात येणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पायाभूत सुविधांमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. हा बदल करण्याची आवश्यकता आहे.  बाजार समितीच्या आवारातील मॅफको कंपनीचे शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) ही सुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे हस्तांतरित करण्यासंदर्भातील निर्णय यापूर्वीच झाला आहे. मात्र, ही इमारत देखील जुनी असल्याने त्याजागी नवीन इमारत उभारून शीतगृहाची सुविधा देण्यात येणार आहे. बाजारपेठेमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग ही मोठी समस्या आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी बहुजमली पार्किंग सुरू करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा करण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही होण्यापूर्वी महापालिकेचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. मार्केट यार्डमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची योजना असून त्यासाठी निविदा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कृषी महाविद्यालयातील ५० एकर जागा ही सेंद्रिय शेतीसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. सध्या या जागेवर ऊस पिकविला जात आहे. ही जागा आता सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकविण्यासाठी आरक्षित करण्यात आली आहे. येत्या महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होणार असून सेंद्रिय शेती कशी करावी, या विषषयीचे मार्गदर्शन देण्याची देखील योजना आहे, असेही त्यांनी सांगितले. कृषी विद्यापीठांच्या प्रादेशिक केंद्रांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader