पुणे : गुढी पाडव्याला फूल बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीस पाठविली असल्याने फूल बाजार बहरला आहे. यंदा शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झेडूची आवक जास्त आहे. त्यामुळे झेंडूला दर कमी मिळाले आहेत.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याला फुलांना मागणी वाढते. फुलांना दर चांगले मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रतीची फुले राखून ठेवतात. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात शुक्रवारी पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीस पाठविली. शनिवारी फुलांची आवक वाढणार असून, चांगल्या प्रतीच्या फुलांना दर मिळाले आहेत, अशी माहिती फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

हार, तोरण, तसेच सजावटीसाठी फुलांना मागणी असते. सजावटकार, किरकोळ बाजारातील फूल विक्रेत्यांकडून फुलांच्या मागणीत वाढ होते. गुलछडी, शेवंती, अष्टर, झेंडू या फुलांना मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी झेंडूला चांगले दर मिळाले होते. त्या वेळी एक किलो झेंडूला प्रतवारीनुसार ५० ते ६० रुपये दर मिळाले होते. यंदा पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. झेंडूची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे, असे भोसले यांनी सांगितले.

फुलांचे एक किलोचे दर

झेंडू – २० ते ४० रुपये
गुलछडी – २५० ते ३०० रुपये
शेवंती – ८० ते १५० रुपये
अष्टर – १२० ते १८० रुपये