पुणे : बंगळुरुतील कांदा व्यापाऱ्याची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. कांदा व्यापाऱ्याने पैसे दिल्यानंतर त्याला कांदा पाठविला नाही. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी एकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय खुशालचंद बोरा असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत शशीकुमार टी. वैद्यलिंगम पिल्लई (वय ४६, रा. रवींद्रनगर, बंगळुरू, कर्नाटक) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शशीकुमार बंगळुरूमधील कांदा व्यापारी आहे. त्यांनी पुण्यातील मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारातून कांदा खरेदीसाठी बोरा याच्याशी संपर्क साधला होता. बोरा याने मार्केट यार्डात त्याचे गाळे असल्याचे त्यांना सांगितले होते. त्यानंतर शशीकुमार यांनी त्याच्याकडून २५ टन कांदा खरेदीचा व्यवहार केला. त्यापोटी त्याला पाच लाख रुपये पाठविले.

हेही वाचा >>> बलात्काराचा गु्न्हा दाखल करण्याच्या धमकी; खंडणी उकळणाऱ्या तरुणीविरुद्ध गुन्हा

२ नोव्हेंबर रोजी ट्रकमधून कांदा बंगळुरुतील पाठविल्याचे बोराने त्यांना सांगितले. कांदा न पोहोचल्याने त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा ट्रकमध्ये बिघाड झाल्याचे सांगून बोराने त्यांना ट्रकमालकाच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने दहा हजार रुपये पाठविण्यास सांगितले. शशीकुमार यांनी दहा हजार रुपये पाठविले. मात्र, कांदा बंगळुरुत पोहोचला नाही. त्यानंतर त्यांनी बोरा याच्याशी संपर्क साधला. तेव्हा बोराने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे तपास करत आहेत.

बाजारात सध्या कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात जुन्या कांद्याला दर मिळाले आहेत. महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिणेकडील राज्यातून मागणी वाढली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market yard police registred case for cheating onion trader from bengaluru of rs 5 lakhs pune print news rbk 25 zws