‘मुलीचे लग्न म्हणजे कर्ज आणि मुलाचे लग्न म्हणजे कमाई’ हा जुनाट विचार अजूनही समाजातून पुरता हद्दपार झालेला नाही. त्यात त्या मुलीला दत्तक घेतलेले असले तर..? लग्न ठरवण्यासाठी पुढे सरसावलेली समोरची मंडळी हे ऐकताच दोन पावले मागे जातात. थोडय़ा फार फरकाने दत्तक मुलांच्या बाबतीतही असेच घडते. दत्तक मुलामुलींना त्यांच्या पालकांनी अगदी मनापासून आपले मानलेले असले तरी त्यांचे लग्न ठरवताना ‘या मुलाचे खरे आईवडील कोण असतील?’ अशी शंका समोरच्याच्या मनात येतेच येते. या शंका-कुशंकांना आणि निर्थक चर्चाना फाटा देऊन लग्नाळू मुलीचे किंवा मुलाचे ‘दत्तक’पण सर्वानी खुलेपणाने स्वीकारावे यासाठी एक विशेष वधू-वर सूचक संकेतस्थळ काम करणार आहे.
http://www.matrimonyforadopted.org असे या  संकेतस्थळाचे नाव आहे. ‘कम्युनिकेशन सपोर्ट फाउंडेशन’ आणि ‘डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशन’ या दोन संस्थांनी हे संकेतस्थळ तयार केले असून नुकतेच ६ डिसेंबरला नवी दिल्ली येथे त्याचे उद्घाटन करण्यात आले.
या संकेतस्थळाची संकल्पना मांडणारे प्रदीप दीक्षित म्हणाले, ‘‘दत्तक मुलामुलींचे पालक जेव्हा त्यांच्या विवाहासाठी प्रयत्न करतात, तेव्हा आपल्या पाल्याचे दत्तक असणे सांगावे की नको, अशी चलबिचल त्यांच्या मनात होते. जे पालक या गोष्टीविषयी सांगतात, त्यांना अडचणीही येतात. पण लग्नानंतर ते कळले तर नात्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे लग्नासाठी प्रयत्न करतानाच आपले अपत्य दत्तक आहे हे मोकळेपणाने सांगितले जावे आणि ते तितक्याच खुलेपणाने स्वीकारण्याची मानसिकता तयार व्हावी, असा या संकेतस्थळाचा उद्देश आहे. माझी स्वत:ची दत्तक मुलगी या कल्पनेसाठी प्रेरणास्रोत ठरली. दत्तक मुलामुलींबरोबरच ज्यांना अशा मुलामुलींशी विवाह करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तीही या संकेतस्थळावर नावे नोंदवू शकतील.’’
इच्छुकांनी शंकानिरसनासाठी  pradeep@csf.org.in ई-मेल पत्त्यावर किंवा ९९७०१६२८४६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Story img Loader