चांगले काम मिळवून देण्याच्या आमिषाने तेरा वर्षांच्या मुलीस पंजाब येथे नेऊन तिचा बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून मुलीची सुटका करण्यासाठी विमानतळ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
याबाबत मुलीच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून नंदू साखरे व छाया साखरे (रा. लोहगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरे दाम्पत्य हे पीडित मुलीचे नातेवाईक आहेत. पीडित मुलीची आई येरवडा परिसरात धुणे-भांडी करण्याची कामे करत होती. त्यामुळे साखरे यांनी पीडित मुलगी व तिच्या आईला पंजाबमध्ये चांगले काम लावण्याचे आमिष दाखवून पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेजवळ असलेल्या कांदवा गावात त्यांना घेऊन गेले. त्या ठिकाणी गुरुजीत नावाच्या ज्येष्ठ व्यक्तीसोबत आईचा विरोध असताना देखील तिच्या मुलीचा विवाह लावून दिला. या विवाहाला पंधरा दिवस झाले असून मुलीच्या आईने पुण्यात येऊन विमानतळ पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा व इतर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कोलते हे अधिक तपास करीत आहेत.
याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी सांगितले, की पीडित मुलगी अद्यापही विवाह केलेल्या व्यक्तीच्या ताब्यात आहे. होशियारपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कळवून मुलीस ताब्यात घेण्यास सांगितले आहे. मुलीचा ताबा आणि आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झाला आहे.
पुण्यातून फसवून नेलेल्या मुलीचा पंजाबात बालविवाह
चांगले काम मिळवून देण्याच्या आमिषाने तेरा वर्षांच्या मुलीस पंजाब येथे नेऊन तिचा बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
First published on: 03-08-2015 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage crime police