पुणे : विवाहानंतर दोघांनी महिन्याभराचा संसार केला. मात्र, वैचारिक मतभेदांमुळे दोन वर्षे वेगळे राहणाऱ्या या दाम्पत्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या दाम्पत्याचा घटस्फोट कौटुंबीक न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. आराध्ये यांनी अवघ्या एक दिवसात मंजूर केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे १८ महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्यांचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे दोन वर्षांपासून वेगळे रहात असल्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे. राहुल आणि शीतल (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. डिसेंबर २०२० मध्ये दोघांचे लग्न झाले.
दोघेही पुण्यातीलच आहेत. एक महिना संसारानंतर जानेवारी २०२१ पासून दोघे विभक्त राहू लागले. एप्रिल २०२२मध्ये पतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. त्याला पत्नीचे वकील हजर राहिले. त्यानंतर दोन्ही पक्षात बोलणी झाली. परस्पर संमतीने अर्ज दाखल करण्याचे ठरले. त्यानुसार केलेला अर्ज न्यायालयाने एका दिवसात मंजूर केला. शीतलच्या वतीने ॲड. अनिकेत भोसले, ॲड. शिल्पा टापरे आणि ॲड. तेजस वीर यांनी काम पाहिले.