सध्या लग्नसराईचे दिवस असून ऐन वर्दळीच्या वेळी नाचणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या अतिउत्साहामुळे वाहतुकीची कोंडी होत असून वाहनस्वारांमध्ये प्रचंड मनस्ताप होत असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
रावेत, वाल्हेकरवाडी, रहाटणी, काळेवाडी, भोसरी आदींसह शहरातील विविध भागात लहान-मोठी कार्यालये आहेत. सध्या लग्नसराई असल्याने विवाह समारंभ सुरू आहेत. लग्नापूर्वी काढण्यात येणाऱ्या मिरवणुका तसेच रात्रीच्या वेळी निघणाऱ्या वराती सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने तीव्र डोकेदुखी ठरल्या आहेत. मिरवणुकांमध्ये स्पीकरच्या भिंती लावून नाचणाऱ्या तरुणांना कसलेही भान दिसत नाही. त्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. एखाद्या जाणत्याने तसे निदर्शनास आणून दिले तरीही कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. वरातीत दारू पिऊन नाचण्यावरून भांडणे ठरलेलीच आहेत. काही वेळा जाणीवपूर्वक रस्ता अडवून धरण्याचे काम केले जाते. दरवर्षी लग्नसराईत हा त्रास नागरिकांना होतो आहे. तथापि, यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. काही वेळा पोलिसांकडून कारवाईचा प्रयत्न झाला. मात्र, राजकीय दडपण आल्याने त्यांना माघार घ्यावी लागली, अशी उदाहरणे आहेत. त्यामुळे वाहतूक पोलीसही हतबल झाल्याचे दिसते.

Story img Loader