पिंपरी : गर्भपात करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकला. आईचा मृतदेह पाहून रडू लागलेल्या दोन्ही मुलांनाही आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी नदीत फेकून दिल्याचा प्रकार सोमवारी (दि. २२ जुलै) सकाळी उघडकीस आला.
प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीची चौकशी करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. त्या महिलेला तिच्या प्रियकराने गर्भपात करण्यासाठी ठाणे येथे त्याच्या मित्रासोबत पाठविले होते. त्या ठिकाणी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
महिलेचा मृतदेह आणि तिच्या दोन्ही मुलांना प्रियकराच्या मित्राने ९ जुलै रोजी वराळे येथे आणले. महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. दरम्यान महिलेची दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. आरोपींनी आपले बिंग फुटेल म्हणून दोन्ही मुलांना जिवंतपणे नदीमध्ये फेकून दिले. तिघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.