लोकसत्ता वार्ताहर

पुणे : निरा येथील नीता सचिन निगडे (वय ३०) या विवाहितेने सासूच्या छळास कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली . या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी तिची सासू विजया भगवान निगडे (वय ५५, रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे) हिला अटक केली असून सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने सासूची रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात आली आहे .

नीता निगडे यांचे वडील सुभाष शंकर माने (रा. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर ) यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दाखल केली आहे .जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नीताची सासू विजयाही नीता यांना वेळोवेळी लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, सारखी शिवीगाळ करणे, घरची गरिबी असल्याने सारखे टोचून बोलणे, हिणवणे, मुलगा होत नव्हता तेव्हा घालून-पाडून बोलणे. नीताच्या साड्या जाळून टाकणे.अशा प्रकारचा त्रास देत होती.

काही दिवसांपूर्वी त्यांनी नवीन फ्लॅट बुक केला . तेथे राहायला जाण्याअगोदर माहेरून एक लाख रुपये घेऊन ये असा तगाद लावला होता. मात्र नीता यांच्या माहेरची परिस्थिती पैसे देण्यासारखी नव्हती.अशा प्रकारच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून नीता यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. नीता यांनी राहत्या घरी गळफास घेतल्यानंतर मोठ्या संख्येने त्यांचे नातेवाईक निरा प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा झाले. संतप्त वातावरण निर्माण झाल्याने जेजुरी व निरा पोलीस घटनास्थळी धावले.

निरा विभागाचे फौजदार सर्जेराव पुजारी घनश्याम चव्हाण हरिश्चंद्र करे यांनी वातावरण शांत केले, नातेवाईकांची समजूत काढून योग्य ती कायदेशीर कारवाई करू, असे आश्वासन दिले त्यानंतर अंत्यविधी करण्यात आला. नीता व सचिन यांना दोन मुली व एक लहान अडीच वर्षाचा मुलगा आहे. सचिन यांचा व्यवसाय आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नव्या फ्लॅटमध्ये निगडे कुटुंब राहायला जाणार होते.

नीता व सचिन यांनी निरा येथे काही पैसे भरून नवीन फ्लॅट बुक केला होता.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे कुटुंब फ्लॅटमध्ये राहिला जाणार होते. मात्र पैशावरून सासू सारखी कुरबुर करत होती .माहेरून एक लाख रुपये आण असा सारखा तगादा लावला होता. या कुटुंबाला दोन मुली व एक लहान मुलगा आहे. नीताच्या आत्महत्येची दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता पत्नीच्या पश्चात या लहान मुलांचे संगोपन कसे करायचे अशा विवंचनेमध्ये वडील सापडले आहेत.