पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लोणावळा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत नेऊन बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली आहे. ३१ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपी फरार आहे. त्याचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय महिला आणि आरोपीची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली. त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. आर्थिक अडचण आहे, असे म्हणून पीडित महिलेकडून त्याने पाच लाख रुपये आणि पाच तोळे सोन्याचे दागिने घेतले.
हेही वाचा >>> पुणे : व्यवसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या सावकारांना बेड्या; पिस्तुलाच्या धाकाने अपहरण करून उकळले पैसे
आरोपीने पीडित विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लोणावळा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. न्यूड फोटो काढून पीडित महिलेला धमकवण्यात आले. कालांतराने पीडित महिला फोन उचलत नसल्याने न्यूड फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवीन, असे म्हणून पुन्हा धमकी दिली. तसेच, पीडित महिलेच्या भावाला फोन करून आरोपीने अश्लील शिवीगाळ केली. पीडित महिलेच्या वाॅट्सॲप फॅमिली ग्रुपवर बदनामीकारक मॅसेज केला. या सर्व घटनेप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्याचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत.