देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळे आपण आनंदाने दिवाळी साजरी करू शकतो. स्वातंत्र्यसैनिकांमुळे देश स्वतंत्र झाला. तर सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहिले. परंतु, लढताना अनेक सैनिकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते. त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नीचाही यामध्ये मोठा त्याग आहे. त्यामुळे शहीद सैनिकांच्या वीरपत्नींच्या या कार्याला आपण सलाम करू या, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केली.
सैनिक मित्र परिवार आणि रोटी क्लब ऑफ पुणे मिडटाउनतर्फे दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुबोध भावे यांच्या हस्ते तिरंगी उपरणे, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. वानवडी येथील बेपत्ता आणि शहीद सैनिकांच्या पत्नींचे वास्तव असलेल्या संस्थेतील २० वीरपत्नी या कार्यक्रमास उपस्थित होत्या. रोटरी क्लबचे किशोर आदमणे, नारद मंदिराचे अॅड. मकरंद औरंगाबादकर, देवव्रत बापट, शिरीष मोहिते, गिरीश पोटफोडे, राजू पाटसकर, शाहीर हेमंत मावळे, सैनिक मित्र परिवारचे अध्यक्ष अशोक मेहेंदळे आणि आनंद सराफ या वेळी उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात करणाऱ्या लोकमान्य टिळकांची भूमिका मला चित्रपटातून साकारायला मिळत आहे. ही भूमिका साकारताना अंगावर उभे राहणारे रोमांच अनुभवले असल्याने सीमेवरील जवानांच्या कार्याची महती मी समजू शकतो. सीमारेषेपलीकडे गेलेले अनेक सैनिक आजही बेपत्ता आहेत. त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीय या सैनिकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्या सैनिकांची लवकरच स्वत:च्या कुटुंबीयांशी भेट होवो, असेही सुबोध भावे यांनी सांगितले. शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांचे वडील चंदूकाका गोडबोले यांनी मनोगत व्यक्त केले. शाहीर होनराज मावळे यांनी गीत सादर केले.
दीपज्योतींनी उजळली सारसबाग
तुतारी आणि सनईचे मंजूळ सूर.. नेत्रसुखद रंगावलीच्या पायघडय़ा.. विविधरंगी प्रकाशाचा झोत अनुभवणारे आकाशकंदील.. भल्या पहाटे सजून आलेल्या नागरिकांसह युवक-युवतींचा अमाप उत्साह.. एक-एक पणती प्रज्लवित झाली आणि हजारो दीपज्योतींनी सारसबाग उजळली. सारसबाग मित्र मंडळातर्फे शुक्रवारी पाडव्याच्या पहाटे सारसबाग मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. सारसबागेत नियमित फिरावयास येणारे नागरिक आणि विविध संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या. या दीपोत्सवाचे यंदा १९ वे वर्ष होते. मंडळाचे अध्यक्ष अॅड. एन. डी. पाटील, अनिल गेलडा, अॅड. शिरीष शिंदे, शिवाजी भागवत, पोपटलाल ओस्तवाल, माधव चिरमे, कल्पना रावळ, शिवाजी खेडेकर, दिलीप तातुसकर, नितीन काकडे, दिलीप रायसोनी, श्याम काळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
शहीद सैनिकांच्या वीरपत्नींना सलाम
लढताना अनेक सैनिकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते. त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नीचाही यामध्ये मोठा त्याग आहे. त्यामुळे ...
आणखी वाचा
First published on: 26-10-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Martyr family subodh bhave honour