“पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाईचे ३६२ कोटी खर्चाचे वादग्रस्त काम रद्द करावे, या कामासाठी आवश्यक साहित्य महापालिकेने खरेदी करावे आणि पालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली रस्तेसफाईची कामे करावीत,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी पालिकेचे प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादीचा आमदार आणि युवा नेत्याचे या कामात आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. यासंदर्भात भापकर यांनी एक निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.
मारूती भापकर म्हणाले, “रस्ते सफाईची निविदा प्रक्रिया राबवून ४५० कोटी रुपयापर्यंत खर्च होणार आहे. ही बाब विचारात घेता महापालिकेने या रस्त्याच्या स्वच्छतेच्या कामासाठी स्वमालकीचे रोडस्वीपर, हुक लोडर, टँकर खरेदी करावेत. ते चालवण्यासाठी मानधनावर प्रशिक्षित वाहन चालकांची नियुक्ती करावी. पालिकेच्या कार्यशाळेमार्फत सर्व वाहनांची देखभाल व दुरुस्ती करावी. जेणेकरून अधिकाऱ्यांना वातानुकूलित कक्षात बसून कागदी घोडे नाचवण्याऐवजी प्रत्यक्ष काम करण्याची संधी प्राप्त होईल.”
“यामुळे पालिकेची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचतही होईल. कचरा स्वच्छतेबाबत राजकीय नेत्यांच्याच कंपन्यांची मक्तेदारी आहे. राजकीय नेते, अधिकारी व कंत्राटदार मिळून पालिकेच्या तिजोरीची संगनमताने लूट करीत आहेत,” असा आरोप करत भापकर यांनी याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.