अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या भोवतालच्या कंपूच्या कारभाराला कंटाळून आम आदमी पक्षाचे पुण्यातील नेते मारुती भापकर यांच्यासह राज्यातील ३७६ कार्यकर्त्यांनी सोमवारी पक्षाला रामराम ठोकला. मारुती भापकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सामूहिक राजीनाम्यांबद्दल माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी ‘आप’मधून हकालपट्टी करण्यात आलेले योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी सुरू केलेल्या ‘स्वराज’ अभियानाला या सर्वांनी पाठिंबा दिला आहे. यापुढे स्वराज अभियानासाठी काम करण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्रात आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढविणारे सुभाष वारे यांनी आपला राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे पुण्यामध्ये आता ‘आप’मध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
योगेंद्र यादव यांनी दिल्लीमध्ये सुरू केलेल्या स्वराज संवाद कार्यक्रमाला भापकर उपस्थित होते. तेव्हापासूनच ते ‘आप’मधून बाहेर पडणार, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.

Story img Loader