अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणात निलंबित सनदी अधिकारी मारुती सावंत यांना विशेष न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि सात लाख रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे यांनी शनिवारी सुनावली.
तेरा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार व तीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मारुती हरी सावंत (रा. हिंगणे खुर्द) यांच्या विरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात बलात्कार, विनयभंग, धमकावणे, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो), अनुसूचित जाती-जमातींवरील अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मारुती सावंत यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यावेळी ते महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालक पदावर कार्यरत होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर राज्य शासनाने त्यांना निलंबित केले होते. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मिलिंद मोहिते आणि पोलिस हवालदार राजेंद्र गिरमे यांनी तपास केला होता. आरोपीविरोधात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आला होता.
बलात्कार, धमकावणे, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसुचित जाती-जमातींवरील अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्हा सिद्ध न झाल्याने सावंत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली मात्र, माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार सावंत यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रताप परदेशी यांनी दिली.
तपासात सावंत यांच्या घरातील संगणकावर अश्लील ध्वनीचित्रफित तसेच छायाचित्रे सापडली होती. सरकार पक्षाकडून १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. तपासले. या प्रकरणातील पीडितेने साक्ष फिरवली. सावंत यांच्या संगणकाची हार्डडिस्कची तपासणी करून न्याय वैद्यक प्रयोगशाळेने दिलेला अहवालाच्या आधारे माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांनुसार न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविण्यात आले, असे विशेष सरकारी वकील परदेशी यांनी नमूद केले.
असे आले प्रकरण उघडकीस
पीडित मुलींच्या शाळेत समुपदेशनासाठी महिला समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली होती. त्या वेळी एका समुपदेशक महिलेला पीडित मुलींनी एक व्यक्ती दुपारच्या वेळेत त्यांच्या सदनिकेवर बोलावून खाऊसाठी पैसे आणि चॉकलेट देऊन संगणकावर अश्लील छायाचित्र दाखवून लैंगिक छळ करते, असे सांगितले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.