दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेची भीती असताना प्रत्यक्षात मात्र रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे दिसते. दुसऱ्या लाटेची शक्यता कमी असली, तरी या टप्प्यावर गाफील राहता कामा नये. लस उपलब्ध झाली, तरी २०२१ मध्ये मुखपट्टी, शारीरिक अंतर आणि स्वच्छता हे नियम पाळले जाणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला राज्य करोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी बुधवारी दिला.

‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या वेबसंवादात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कु बेर आणि वरिष्ठ साहाय्यक संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी डॉ. पंडित यांच्याशी संवाद साधला. या वेळी राज्यासह देशातील नियंत्रणात आलेली करोना रुग्णसंख्या तसेच येऊ घातलेल्या लशीबाबत डॉ. पंडित यांनी मनमोकळी चर्चा केली.

डॉ. पंडित म्हणाले, दिवाळीनंतर करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. प्रत्यक्षात राज्यासह देशभरात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. ही बाब दिलासा देणारी असली, तरी हीच वेळ अधिक काळजी घेण्याची आहे. दाटीवाटीच्या भागांमध्ये समूह प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) आली असणे शक्य आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर आणखी काही प्रमाणात लोकसंख्येमध्ये करोना प्रतिपिंडे (अँटीबॉडी) तयार होतील. त्यामुळे लशीकरणानंतर चित्र दिलासादायक असेल. लस येईपर्यंत नागरिक घाबरून राहिले आणि त्यानंतर भीती संपणेही धोक्याचे आहे. लस घेतल्यानंतर करोना संसर्ग होणारच नाही, असे नाही. संसर्ग होऊन त्याची लक्षणे अत्यंत सौम्य राहण्याची शक्यता आहे. फ्लूची लस दरवर्षी घेणे अपेक्षित आहे. विषाणूमध्ये झालेल्या बदलाला (म्युटेशन) अनुसरून दरवर्षी नव्या स्वरूपातील फ्लूची लस येते, तशी ती करोनाचीही येऊ शके ल. त्यामुळे दरवर्षी लस घेणे आणि त्याबरोबरच मुखपट्टीचा वापर, अंतर राखणे, स्वच्छता हे नियम पाळण्याची गरज यापुढे कायम राहणार आहे.

संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णांकडून होणारा विलंब हे मृत्युदर अधिक असण्याचे एक प्रमुख कारण होते, आता चित्र बदलत आहे. फॅमिली डॉक्टर स्तरापासून ते रुग्णालय स्तरापर्यंत लक्षणे असलेले रुग्ण लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे उपचार लवकर सुरू होत आहेत. मात्र, महाराष्ट्रात मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या सहव्याधींचे प्रमाण मोठे असल्यामुळे एका मर्यादेनंतर म्हणजे दोन टक्क्यांपेक्षा राज्यातील मृत्युदर कमी होण्याची शक्यता नसल्याचेही डॉ. राहुल पंडित यांनी स्पष्ट केले. करोना संसर्गाचे रुग्ण देशात आढळण्यास सुरुवात झाली त्या वेळी असलेले आजाराचे स्वरूप आणि आताचे स्वरूप यात किं चित फरक दिसत आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांमध्येही त्याची तीव्रता कमी झाली आहे. सुरुवातीच्या काळात हा आजार पूर्ण नवीन होता, त्यावर उपचार नाहीत असेही बोलले जात असे. त्यामुळे नागरिकांमध्ये त्याबाबत भीती होती. आता ती भीती काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसते, उपचार घेतल्यानंतर आपण बरे होऊ हा विश्वास नागरिकांमध्ये आल्याचे निरीक्षणही डॉ. पंडित यांनी नोंदवले.

मीही करोना मुक्त..

मला करोनाची बाधा झाली होती आणि त्यातून सुखरुप मुक्तही झालो. ही बाधा अतिदक्षता विभागातून झाली नाही. बाधित परंतु निदान न झालेल्या व्यक्तीशी जवळपास १५ मिनिटे बोललो होतो. त्यावेळी मी घातलेली मुखपट्टी दोन वेळा नाकावरून खाली घसरली होती. त्यामुळे मला बाधा झाली असावी.  संसर्गापासून दूर राहण्यासाठी मुखपट्टी आणि सुरक्षित अंतर या नियमांचे पालन गरजेचे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

दोनशेहून अधिक डॉक्टरांवर उपचार

माझ्याकडे आत्तापर्यंत दोनशेहून अधिक करोनाबाधित डॉक्टर उपचारांसाठी दाखल झाले असून यातील शंभरहून अधिक अतिदक्षता विभागात होते. डॉक्टरांचे कुटुंब संपूर्णपणे विश्वास ठेवून उपचार करण्यास संमती देतात. परंतु ५० ते ६० टक्के डॉक्टर हे प्रत्यक्षात रुग्ण झाले तरी रुग्ण म्हणून डॉक्टरांवर विश्वास ठेवून उपचार घेण्यास तयार होत नाहीत. त्यात वैद्यकीय क्षेत्रात वरिष्ठ आणि कनिष्ठ ही उतरंड असल्याने अनुभवाने आणि वयाने मोठय़ा डॉक्टरांवर उपचार करताना त्यांना न दुखवता दिल्या जाणाऱ्या उपचारांबाबत पूर्ण कल्पना देऊनच पुढे जावे लागते.

 ‘रेमडेसिवीर’- आजाराच्या शोधातील औषध

‘इबोला’ या आजारासाठी निर्मिती केलेले हे औषध त्यावेळीही फायदेशीर ठरले नाही आणि आता करोनातही फारसे फायदेशीर नसल्याचे अनेक अभ्यासातून मांडले आहे. त्यामुळे हे असे औषध आहे जे कोणत्या आजारावर उपयोगी पडेल याच्या शोधात आहे. सध्या विषाणूची तीव्रता कमी करण्यासाठी रेमडेसिवीरशिवाय कोणतेही अन्य परिणामकारक औषध नसल्याने याचा वापर करण्याबाबतचे अधिकार तज्ज्ञ डॉक्टरांवर कृती दलाने सोपविले आहेत.

फ्लू किंवा न्युमोनियाची लस करोनाप्रतिबंधात्मक नाही

फ्लू किंवा न्युमोनियाची लस ६० वर्षांवरील, मधुमेह, उच्च रक्तदाबासारखे सहआजार किंवा दमा, सीओपीडी इत्यादी श्वसनाचे आजार असलेल्यांना घेण्याचा सल्ला आम्ही देतो. परंतु आता करोना संसर्गामुळे फुप्फुसांवर परिणाम झालेल्यांना फ्लू किंवा न्युमोनियाची बाधा झाल्यास त्रास वाढू शकतो. त्यामुळे आता बहुतांश डॉक्टर या रुग्णांना ही लस घेण्याचा सल्ला देत आहेत. परंतु यामुळे करोनाची बाधा होणार नाही, असे नसल्याचे डॉ. पंडित यांनी स्पष्ट केले.

लस आवश्यकच

करोनाची साथ अजून संपुष्टात आलेली नाही. सामूहिक प्रतिरोधशक्तीही कितपत फायदेशीर असेल हे सिद्ध झालेले नाही. तसेच सार्सप्रमाणे हा विषाणू नाहीसा होण्याची चिन्हेही नाहीत. त्यामुळे संसर्गाची तीव्रता कमी झाल्याने लशीची आवश्यकता नाही याला वैज्ञानिक पुरावे नाहीत. त्यामुळे सध्या असे म्हणता येणार नाही.

अनाठायी भीती नको

भीतीचा फायदा घेत बाजारात निर्माण केलेल्या प्लायवूडपासून दंतमंजनपर्यंत अनेक उत्पादनांद्वारे विषाणूमुक्त होण्याचा दावा केला जात आहे. एवढी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे डॉ. पंडित म्हणाले. लोक गाफील झाले तर संसर्ग प्रसाराचा धोका अधिक वाढेल, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader