पुणे : राज्य सरकारच्या महाज्योती या संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षा तयारी शिष्यवृत्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार झाल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून करण्यात येत आहेत. आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ओबीसी समाजातील उमेदवारांना यूपीएससी-एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यासाठी महाज्योतीतर्फे परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली जाते. त्या अनुषंगाने महाज्योतीतर्फे १६ जुलैला परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत.
हेही वाचा >>> अतिवृष्टीपुढे राज्य मंडळाचा मोठा निर्णय : दहावी, बारावीची परीक्षा लांबणीवर
परीक्षेदरम्यान काही उमेदवारांनी संगणक आणि इंटरनेटचा वापर केल्याची माहिती उमेदवारांनी दिली. या प्रकारामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे उमेदवारांनी सांगितले. महाज्योतीमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पुण्यातील काही केंद्रांवर सामूहिक कॉपी झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या युवांवर अन्याय होत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करुन ही फेरपरीक्षा घ्यावी, एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ३० जुलै आणि १३ ऑगस्ट रोजी अशी परीक्षा घेण्यात येणार असून त्यावेळी असे गैरप्रकार होऊ नयेत, याचीही दक्षता घ्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी ट्विटद्वारे केली.