लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कल्याणीनगर परिसर अपघाताच्या घटनेमुळे चर्चेत आले असताना शनिवारी (१ जून) रात्री नाकाबंदीत ताब्यात घेण्यात आलेल्या एका तरुणाकडून पोलीस अधिकाऱ्याने पाय दाबून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून, वाहतूक विभागातील त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कल्याणीनगर भागात शनिवारी रात्री वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली होती. कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर भरधाव वेगाने वाहन चालविणारे वाहनचालक, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आता अचानक नाकाबंदी करण्यात येत आहे. वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
आणखी वाचा-धक्कादायक! म्हाडाच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावावर पावणेतीन लाखांची लाच
कल्याणीनगर परिसरात शनिवारी रात्री पोलिसांचे पथक वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी एका मोटारीतून तरुण निघाले होते. तरुण मुळचे सणसवाडीतील आहेत. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. गाडीची कागदपत्रे नसल्याने त्यांनी मोटारचालकाला दंड केला. त्यानंतर नाकाबंदीतील पोलीस कर्मचारी मोटारीतील एका तरुणाला घेऊन काही अंतरावर खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्याकडे घेऊन गेला. पोलीस अधिकाऱ्याने तरुणाची कानउघाडणी केली. त्याला पाय चेपायला सांगितले. कारवाईच्या भीतीमुळे तरुणाने पोलीस अधिकाऱ्याचे पाय चेपून दिले. त्यानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली. नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाकडून पाय चेपण्याची चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
© The Indian Express (P) Ltd