सोसाटय़ाच्या वाऱ्यात इवलीशी ज्योत पटकन विझते. जोराच्या पावसात तर वायरींमधून वाहणारी वीजही विझते. पुण्यात राहणाऱ्या प्रत्येकाला वाऱ्याच्या झुळकीनेही खांबावरची वीज विझत असल्याचा अनुभव आलेला असेल. तंत्रज्ञान बदलले, पण वीज जाण्याचा अनुभव मात्र अजूनही तसाच आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने पुण्यातले रस्ते पाण्याने वाहू लागले आणि वीज गायब झाली. गायब झालेली वीज कधी येईल, हे सांगणे महावितरणला कमीपणाचे वाटत असल्याने, ते कोणालाही कसलीही उत्तरे देण्यास बांधील नसतात. त्यांचे चौकशीचे दूरध्वनी एकतर उद्धट उत्तरांसाठी असतात किंवा काढून ठेवण्यासाठी असतात. चोवीस तास अखंड वीजपुरवठा ही पुण्यासारख्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या शहराची गरज अजूनही महावितरणला पुरी करता आलेली नाही. याचे कारण केवळ कागदी घोडे नाचवत आजवर महावितरणने पुण्याच्या नाकाला पानेच पुसण्याचे काम केले.
वीजबिल वेळेत भरण्यात पुणेकरांचा हात कुणी धरू शकणार नाही. पुण्याच्या महावितरणचा महसूल अन्य कोणत्याही शहराच्या तुलनेत उत्तम म्हणावा असा. पण हा महसूल नेमका कुठे जिरतो, हे कळत नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात तासन्तास वीज गायब होणे हे आता पुणेकरांच्या अंगवळणी पडले आहे. घरोघरी वीजबिल पोहोचवण्याची जबाबदारी एका खासगी संस्थेकडे देण्यात आली आहे. पण ती संस्था ते काम वेळेत करते किंवा नाही, यावर कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे बिल भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी ते हातात पडते आणि त्यामुळे वेळेत भरणे शक्य होत नाही आणि दंडाचा भुर्दंड बसतो. बिल वेळेत भरले, तर मंडळातर्फे काही सूट दिली जाते. ती सूट केवळ बिल वेळेत न मिळाल्यामुळे मिळू शकत नाही.
दरवर्षी पावसाळ्याच्या आधी वीजवाहक तारांच्या आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढण्याचे काम करत असल्याचे महावितरण अगदी उत्साहाने सांगते. प्रत्यक्षात जराशा पावसानेही महावितरणची बत्ती गुल होते. एवढेच काय, वीज पुरवठा नीट सुरू राहावा यासाठी नियमितपणे आठवडय़ातील एक दिवस तीन ते सहा तास वीज बंद ठेवण्यात येते. हे लोडशेडिंगचे प्रकरण तर पुण्याच्या पाचवीलाच पुजले आहे. दर आठवडय़ाला वीज बंद ठेवूनही जर ती गायब होत असेल, तर मग कामे होतात यावर विश्वास कोण ठेवणार? पुण्यातल्या उद्योगांनी महावितरणच्या या भयानक कारभाराला कंटाळून स्वत:च वीज निर्माण करण्याची कल्पना मांडली. त्या वेळी महावितरणनेही त्याचे स्वागत केले. उद्योगांनी तयार केलेली महाग वीज महावितरणने खरेदी करायची आणि त्या बदल्यात अखंड वीज पुरवठा सुरू ठेवायचा, पण त्यासाठीही सामान्य पुणेकरांनी विजेच्या प्रत्येक युनिटमागे अन्य कोणत्याही शहरातील दरापेक्षा अधिक पैसे द्यायचे, असा हा प्रस्ताव अखंड पुरवठय़ाच्या आमिषापोटी पुणेकरांनीही तो मान्य केला. पण महावितरणने मात्र त्यातून काहीच साध्य केले नाही. काही वर्षांनी उद्योगांनी पाठ फिरवली आणि पुणेकरांना पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’चे दु:ख सहन करत बसावे लागले.
महावितरणचे नियम तर अतिशय त्रासदायक. बिल प्रचंड रकमेचे आले तरी ते संपूर्णपणे आधी भरायचे, मगच तक्रार करायची, असा हा उफराटा कारभार. कोणत्याही प्रगत देशात वाऱ्याने किंवा पावसाने वीज जाण्याचे प्रकार घडत नाहीत. पण पुण्यात ते दरवर्षी ठरवल्यासारखे घडतात. शहर असूनही खेडय़ापेक्षा भयानक अवस्थेत पुणेकर अक्षरश: मारूनमुटकून राहतात. पण महावितरणला त्याबद्दल जराही चाड नसते.
महावितरणची अकार्यक्षमता आणि कमालीचा भ्रष्टाचार, याला आता पुणेकर कंटाळले आहेत. किती संस्थांविरुद्ध किती वेळा आंदोलने करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. अशा आंदोलनांना भीक न घालणारे अधिकारी जोवर आहेत, तोवर पुण्यात अंधारच राहील.
मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com