पिंपरी : भोसरी एमआयडीसी सेक्टर दहा परिसरातील ऋषी पॉली बॉण्ड या प्लास्टिक मोल्डिंग करणाऱ्या कंपनीला रविवारी भीषण आग लागली. या आगीत प्लास्टिक कंपनी भस्मसात झाली. सुदैवाने कंपनीला सुटी असल्याने यामध्ये कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. भोसरी एमआयडीसी सेक्टर दहा औद्योगिक परिसरात ऋषी पॉलि बॉण्ड ही कंपनी आहे. रविवारी कंपनीतील कामगारांना सुटी असते.
हेही वाचा >>> राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
रविवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास कंपनीतील साहित्याला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. कंपनीत प्लास्टिकचे साहित्य असल्याने काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. अग्निशामक दलाच्या सर्व केंद्रांसह पीएमआरडीए व खासगी कंपन्यांच्या एकूण १५ ते २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कंपनीच्या सुटीचा दिवस असल्याने कंपनीमध्ये एकही कामगार नव्हता. यामुळे मोठी जीवितहानी टळली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.