नारायणगाव : नारायणगाव येथील बाजार पेठेतील मुथ्था मार्केटमधील दुमजली अष्टविनायक रेडिमेड कापड दुकानाला भीषण आग लागली. मंगळवारी पहाटे पाच वाजता लागलेल्या या आगीची झळ शेजारील दुकानांनाही लागली. जुन्नर आणि राजगुरूनगर येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी वेळेत दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.
नारायणगावमधील एसटी बसस्थानकाशेजारी मुख्य बाजारपेठेत नंदराम मुथ्था मार्केटमध्ये धवल सुरेश चव्हाण यांच्या मालकीचे दुमजली अष्टविनायक रेडिमेड कापड आहे. आग लागल्याची माहिती वैभव मुथ्था व रज्जाक काझी यांनी अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, उपसरपंच योगेश पाटे ,विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जुन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके घटनास्थळी दाखल झाले. विघ्नहर साखर कारखाना आणि राजे छत्रपती प्रतिष्ठानचे बंब, आकाश कानसकर यांचा खाजगी टँकर, कांदळी औद्योगिक वसाहतीचा बंंब यांंच्या सहाय्याने सुमारे ५ तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी कापड दुकानाची भिंत तोडली. जुन्नर अग्निशामक दलाचे जवान राजकुमार चव्हाण यांनी शिडीच्या मदतीने पहिल्या मजल्यावरील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आगीची झळ अष्टविनायक रेडिमेड दुकानाशेजारील वऱ्हाडी मेडिकल दुकान, धांडे कलेक्शन या दुकानांंनाही पोहोचली. त्यामध्ये त्यांंचे नुकसान झाले. दुपारी एकच्या सुमारास आग आटोक्यात आली. जुन्नर आणि राजगुरूनगर येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी वेळेत दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.